अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण : व्हिडिओ रेकॉर्डिंग टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा झाकला; संशयित निरीक्षक देयेकर निलंबित
पणजी: आपल्या केबिनमध्ये एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाने, घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा झाकल्याचा आरोप आहे. तरीही, ओल्ड गोवा पोलिसांनी व्हिडिओ फुटेज जप्त केले असून, परिसरात लावलेल्या इतर कॅमेऱ्यांमधील फुटेजचीही तपासणी करत आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ-रेकॉर्डिंगची सुविधाही असल्याचे समजते.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक विकास देयेकर यांनी २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर अशा दोन प्रसंगी अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करण्यापूर्वी, त्यांच्या केबिनमध्ये लावलेला कॅमेरा कथितरित्या झाकला होता. अल्पवयीन मुलीने या घटनेची पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (लैंगिक छळ), १२७ (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे), ४९ (गुन्ह्यास प्रवृत्त करणे), ६१ (२) (अ) (गंभीर गुन्हा करण्याचा गुन्हेगारी कट) सह ३(५) (सामूहिक उद्देश), तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम १० (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि १२ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी संशयित, रंजिनी पालेकर हिच्यावरही गुन्ह्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याला नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रतिष्ठित प्रेसिडेंट्स कलर्स' हा सन्मान मिळाला होता आणि तो सायबर फसवणुकीसह अनेक प्रकरणांचा तपास करत होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने सायबर संबंधित तक्रारीच्या संदर्भात देयेकर याच्याशी संपर्क साधला होता. "तिच्या एका भेटीदरम्यान, ती मुलगी कोणत्याही महिला पोलिस अधिकारी किंवा स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीच्या अनुपस्थितीत त्याच्या बंद केबिनमध्ये सुमारे १५ मिनिटे थांबली होती.... सूत्राने पुढे सांगितले की, देयेकर त्या मुलीला कामाच्या नियमित वेळेनंतर गुन्हे शाखेमध्ये बोलावले होते, जेव्हा बहुतेक कर्मचाऱ्यांची दिवसाची सुट्टी होत असल्याने ते निघून जातात. ओल्ड गोवा पोलिसांनी गुन्हा शाखेच्या परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, ते त्याची चौकशी करण्याची आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
संशयित निरीक्षक देयेकर निलंबित
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संशयित देयेकर याला शनिवारी संध्याकाळी निलंबित करण्यात आले असून त्याला कधीही अटक होऊ शकते. अभियांत्रिकी पदवीधर असलेले देयेकर केपे येथील बार्से ग्रामपंचायतीचे पंचसदस्य म्हणून कार्य केले होते, नंतर ते राज्यातील सर्वात तरुण सरपंचांपैकी एक बनले होते. २०११ च्या उटा प्रकरणांमध्ये संशयित म्हणून नाव आल्यानंतर दोन वर्षांनी, २०१३ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून गोवा पोलिसात दाखल झाले होते.
पोलिस खात्यात गैरवर्तन खपवून घेणार नाहीः डीजीपी आलोक कुमार
पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलिस विभागात गैरवर्तनाला थारा नसून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि इतर संशयितांविरोधात कायदेशीर आणि विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. विभाग कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेणार नाही आणि या प्रकरणी योग्य कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संशयिताविरोधात कायदेशीर आणि विभागीय अशा दोन्ही स्तरांवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
