गोव्याच्या ‘मयंडोळी’ केळ्यांचा केरळमध्ये डंका; गोव्यापेक्षाही अधिक लागवड
विजय मळीक, केरळ | त. भा. वृत्तसेवा : गोव्याला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळालेल्या ‘मयंडोळी’ केळ्यांनी केरळमध्येही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. केरळमधील घराघरांत तसेच हॉटेल व्यवसायात या केळ्यांचा विविध खाद्यपदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असून, त्यांची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
केरळमध्ये मयंडोळी केळी कच्ची तसेच पिकलेली अशा दोन्ही स्वरूपांत खाल्ली जातात. पिकलेली केळी उकडून खाण्याची पद्धतही तेथे लोकप्रिय आहे. याशिवाय या केळ्यांपासून तयार होणाऱ्या केळीच्या चिप्सना मोठी मागणी असून, चिप्स निर्मिती हा केरळमधील महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. कच्च्या केळ्यांची साल काढून त्याचे पातळ गोल काप केले जातात. हे काप खोबरेल तेलात तळल्यानंतर त्यापासून चिप्स तयार केले जातात.
केरळमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही या चिप्सची विशेष मागणी असल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगतात. त्यामुळे मयंडोळी केळ्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना स्थानिक बाजारपेठेसोबतच पर्यटकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
पानांनाही मोठी मागणी
मयंडोळी केवळ फळ म्हणूनच नव्हे, तर त्याच्या पानांमुळेही केरळमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले आहे. केरळमधील अनेक घरांमध्ये आणि हॉटेलमध्ये जेवण वाढण्यासाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी पारंपरिक ताटाऐवजी मोठे केळीचे पान घडी करून जेवण वाढले जाते. त्यामुळे केळ्यांसोबतच त्याच्या पानांनाही बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
या वाढत्या मागणीमुळे केरळमधील अनेक शेतकऱ्यांनी मयंडोळी केळीची लागवड पूरक व्यवसाय म्हणून सुरू केली आहे. गोव्यात प्रसिद्ध असलेली ही केळी आता केरळच्या खाद्यसंस्कृतीचा आणि कृषी बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग बनताना दिसत आहेत.
मुंबई पीआयबीच्या माध्यमातून महाराष्ट्र व गोव्यातील पत्रकारांच्या केरळ दौऱ्यादरम्यान मयंडोळी केळीचा केरळमधील व्यापक वापर आणि त्याला मिळणारी बाजारपेठ जवळून पाहायला मिळाली. गोव्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला केरळमध्ये मिळालेली लोकप्रियता त्याचे वाढते व्यावसायिक महत्त्व अधोरेखित करणारी ठरत आहे.