मराठी राजभाषा प्रश्न संपलेला नाही; भाजपचा पराभव निश्चित : सुभाष वेलिंगकर
मराठी राजभाषेसाठी नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पणजी येथे होणाऱ्या राज्यव्यापी विराट सभेच्या कृतीकार्यक्रमाची आखणी करण्यासाठी फोंडा प्रखंडाचा धडक कृती मेळावा शांतीनगर येथील किड्स नेस्ट शाळेच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते.
1987 च्या राजभाषा आंदोलनानंतर मराठीचा प्रश्न संपल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक करीत आहेत. मात्र, हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. भाजपने निवडणूक जाहिरनाम्यात मराठी राजभाषेचा मुद्दा समाविष्ट केला होता, तसेच विरोधी पक्षात असताना विधानसभेतही हा विषय मांडला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर पर्रीकर सरकारने मराठीच्या विरोधात जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान दिले. त्याचा परिणाम 2017 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला आणि भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह सात मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातून धडा घेण्याऐवजी आजचे नेतृत्व मराठीशी प्रतारणा करीत असल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला.
भाजप सरकारवर मराठीच्या खच्चीकरणाचा आरोप
भाजप सरकारच्या काळात मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांमागे मिळणारे 400 रुपयांचे अनुदान बंद करण्यात आले, नोकरभरती परीक्षांमधून मराठीला हटविण्यात आले आणि मराठी शाळांमधील शिक्षक भरती थांबविण्यात आली, असे आरोप वेलिंगकर यांनी केले. सरकारच्या कार्यकाळात 315 शाळा बंद पडल्या असून, पुढील दोन वर्षांत आणखी 200 शाळा बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मराठीचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठी राजभाषा आंदोलनाला शिक्षण, संगीत, कला, कीर्तन, वारकरी संप्रदाय आणि मंदिरांसह विविध क्षेत्रांतून वाढता पाठिंबा मिळत आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत अडीच हजार संस्थांचा पाठिंबा मिळविण्याचे उद्दिष्ट असून, राज्यभर मराठी राजभाषा रथयात्रा काढण्यात येणार आहे. पेडणे नगरपालिकेच्या सर्व दहा नगरसेवकांनी मराठी राजभाषेला समर्थन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीला तिचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने विशेष विधानसभा अधिवेशन बोलवावे, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली. आगामी पणजी येथील विराट सभा ही आंदोलनाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, महिला शक्ती प्रमुख डॉ. अनिता तिळवे, फोंडा प्रखंड प्रमुख शाणुदास सावंत, दिवाकर शिंक्रे, मच्छिंद्र च्यारी, जयवंत आडपईकर आणि गोविंद देव उपस्थित होते. गो. रा. ढवळीकर यांनी आंदोलनाच्या आगामी कृतीकार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ. अनिता तिळवे यांनीही विचार मांडले, तर मच्छिंद्र च्यारी यांनी पुढील आंदोलनाबाबत सूचना केल्या. गोविंद देव यांनी सूत्रसंचालन केले.
