गोवा बनावटीची पाच लाखांची दारु जप्त
कोल्हापूर :
शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसमोर गोवा बनावटीच्या दारुची तस्करी करणाऱ्या तरुणाला राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. डॅरेल एलेक्स फर्नांडीस (वय 21, रा. आजगाव, शिरोडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी आणि 5 लाख 6 हजार 400 रुपये किंमतीची विदेशी दारु असा 10 लाख 6 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
गोवा बनावटीच्या दारुची चारचाकी गाडीतून वाहतूक केली जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना मिळाली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्कचे शहर उपाअधीक्षक युवराज शिंदे यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिला. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला आयसोलेशन हॉस्पीटल नजीक एक चारचाकी भरधाव वेगाने येत असलेली दिसली.
यावेळी पथकाने संशयावरुन चारचाकी गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीच्या पाठीमागील सिट व डीग्गीमध्ये लपवलेली 5 लाख 6 हजार 400 रुपये किंमतीची गोवा बनावटीच्या विदेशी दारुचे 35 बॉक्स मिळुन आले. यावेळी पथकाने अवैध दारुसह चारचाकी गाडी जप्त केली. तसेच चारचाकीचा चालक डॅरेल फर्नांडीस यालाही अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- तस्काराकडे कसून चौकशी सुरु
संशयीत डॅरेल फर्नांडीसकडे यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का ? जप्त दाऊ कोठे आणि कोणाला पुरवठा करणार होता ? याबाबतची चौकशी सुरू आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे शहर विभागाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी सांगितले.