आचऱ्यात गोवा बनावटीची दारू कारसह जप्त
3 लाख 50 हजाराच्या मुद्देमालासह युवक ताब्यात : आचरा पोलिसांची कारवाई
आचरा | प्रतिनिधी
आचरा तिठा येथील नाकाबंदी दरम्यान आचरा पोलिसांनी कणकवलीकडून आचरातिठा दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी पांढ-या रंगाची बलेनो कार पकडली. यात 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा सापडला. कारसह एकूण 3 लाख 50 हजार 800 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालक तन्मय सुधाकर पांगम ( वय. 22 वर्षे रा. होळीचाखुंट, जुनाबाजार सावंतवाडी, ) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी पहाटे 3.30 च्या दरम्यान करण्यात आली. घटनेचा तपास आचरा पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर करत आहेत.आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा तिठा येथे रोडवर बॅरिकेटस लावून नाकाबंदी करीत चालू असताना पहाटे 03.30 च्या दरम्यान कणकवलीकडून आचरा तिठा दिशेने एक पांढ-या रंगाची चारचाकी कार येताना दिसली. सदर वाहन धारकाने पोलिसांना व रस्त्यावर नाकाबंदी चालू असल्याचे पाहुन त्याने ताब्यातील चारचाकी गाडी वळवून पुन्हा कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन जाऊ लागला नाकाबंदीच्या ठिकाणापासून सुमारे 100 मिटर अंतरावर कार वळवताना पुढे जावून रस्त्याच्या बाजूला दगडावर धडकली त्यात कारचे टायर पंक्चर झाल्याने सदरची गाडी अडकून पडली आचरा पोलिसांनी धाव घेत कार गाठली. पांढ-या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची बलेनो मॉडेलची कार ( MH-07 AG-4590 ) होती कारची पाहणी केली असता कारच्या डिकीमध्ये गोवा बनावटीची दारूचे बॉक्स होते. कारने दगडाला धडक दिली असल्याने कारच्या दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या होत्या कारचे दर्शनी भागाचे नुकसान झाले होते. सदर गाडीतील चालकाला सदर दारू मालाच्या परवाण्याची पोलिसांनी विचारणा केली असता चालकाने सदर दारू मालाचा परवाना नसल्याचे सांगितले. बेकायदेशीर दारू वाहतूक करणारी कार सापडल्यानंतर आचरा पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांनी सदर कार ताब्यात घेत करावाई सुरु केली. कारच्या तपासणीत रुपये 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा सापडला. यात कागदी पुट्ठे असलेले 21 बॉक्स असून प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिली मापाच्या 48 प्लास्टिकच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या कंपनी सिलबंद 1008 बाटल्या सापडल्या. व कार मिळून 3 लाख 50 हजार 800 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालक तन्मय सुधाकर पांगम ( वय. 22 वर्षे रा. होळीचाखुंट, जुनाबाजार सावंतवाडी याच्यावर आचरा पोलीस ठाण्यात दारुबंदी गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करत ताब्यात घेत कारवाई केली आहे. ही कारवाई आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस ठाण्याचे मीनाक्षी देसाई, अमित हळदणकर, विशाल वैजलं, होमगार्ड चंदन त्रिंबककर, प्रतीक भोगले तसेंच पंच म्हणून पोलीस पाटील जगनाथ जोशी, अमोल पेडणेकर, यांचे सहकार्य लाभले. घटनेचा तपास आचरा पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर करत आहेत.