गोवा क्षत्रिय मराठा समाजाचा वाद चिघळण्याची शक्यता
पणजी : गोवा क्षत्रिय मराठा समाज पर्वरी या संस्थेमधील भांडणे मिटण्याचे नाव घेत नाही. त्यातच पद्मनाभ आमोणकर यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतल्यानंतर सोमवारी त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याने समाजाची समिती निवडण्या संदर्भातील वाद हा पुन्हा एकदा ताजाच राहिला. गोवा क्षेत्रीय मराठा समाजाच्या 19 जुलै 2023 रोजी झालेल्या निवडणुकीत बराच गडबड गोंधळ उडाला व त्यात अजित सदाशिव परब यांच्या अध्यक्षतेखाली ज्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्याला अधिकृत मान्यता मिळाली नसल्याने त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले. त्यात त्यांनी पद्मनाभ आमोणकर आणि इतर विऊद्ध अजित परब गोवा क्षेत्रीय मराठा समाज अध्यक्ष अशा पद्धतीने याचिका सादर केली.
पद्मनाभ आमोणकर यांनी न्यायालयात धाव घेतली व पद्मनाभ आमोणकर यांच्यासमोर अध्यक्ष लावण्यात यावे अशी मागणी केली, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कोणाच्याच समितीला मान्यता दिलेली नाही. या तत्त्वावर न्यायालयाने आमोणकर यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. तिथेही आमोणकर यांची डाळ शिजली नाही. न्यायालयाने सेशन कोर्टचा निवाडा उचलून धरला. त्यामुळे पद्मनाभ आमोणकर यांनी त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी हे प्रकरण सुनावणीस आले. त्यात आमोणकर यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला. समाजाच्या कोणत्याही समितीला न्यायालयाने मान्यता दिली नाही. मात्र अजित परब यांनी आपल्या नेतृत्वाखालील समितीची नावे जाहीर केली असून त्यांनी आमोणकर व इतरांनी समाज विघातक कामे करण्याऐवजी समाज बांधणीसाठी प्राधान्य द्यावे असे निवेदन केले आहे.