गोव्याला सायबर गुन्हेगारीचा विळखा!
कोविड महामारीच्या काळात मोबाईलवर नंबर डायल केल्यानंतर डायलर ट्यून वाजायची. ‘कोविडच्या विळख्यातून वाचण्यासाठी वारंवार हात धुवा आणि मास्क घाला’. आता आणखी एक संकट भेडसावत आहे, ते म्हणजे, सायबर फसवणुकीचे. आजही फोन केल्यावर एक डायलर ट्यून आपल्याला सायबर फसवणुकीपासून सावध करते. तरीही दररोज हजारो लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून लाखो, कोट्यावधी रुपये गमावत आहेत.
गोवा राज्य म्हटल्यानंतर ‘खा, प्या आणि मजा करा’ ही ओळख आहे. साहजिकच हे राज्य चैनीचे ठिकाण समजले जाते. आपले शौक, चैन भागविण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांबरोबरच स्थानिक गोमंतकीयांचा सहभाग असतो.कॅसिनो जुगार, मद्य, अमलीपदार्थ तसेच अन्य अवैध गोष्टी आदी सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे या गोष्टी मिळविण्याच्या हव्यासापोटी पैशांची उधळपट्टी होत असते. एकदा का पैशांची चणचण भासली की, सुरू होतो लुटमारीचा धंदा. यामुळे चोऱ्या-माऱ्या तसेच अन्य अवैध मार्गांचा अवलंब केला जातो. सध्या गोव्यातही काहींकडून फसवणुकीचा धंदा सुरू आहे. सध्या गोव्यात भामट्यांचा वावर सुरू आहे. गोव्यात नोकरी, जमीन प्रकरणात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. तसेच अन्य मार्गानेही फसवणूक होत आहे. बहुतांश भामट्यांकडून अनेक क्लुप्त्या लढवून चोरी, लुटमार, फसवणुकीचा फंडा सुरू आहे. त्याचबरोबर सध्या गोव्याला सायबर गुन्हेगारीचाही विळखा पडला आहे.
कोविड महामारीच्या काळात मोबाईलवर नंबर डायल केल्यानंतर डायलर ट्यून वाजायची. ‘कोविडच्या विळख्यातून वाचण्यासाठी वारंवार हात धुवा आणि मास्क घाला’. आता आणखी एक संकट भेडसावत आहे, ते म्हणजे, सायबर फसवणुकीचे. आजही फोन केल्यावर एक डायलर ट्यून आपल्याला सायबर फसवणुकीपासून सावध करते. तरीही दररोज हजारो लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून लाखो, कोट्यावधी रुपये गमावत आहेत.
आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून दक्षिण गोव्यातील करमणे गावातील एका युवतीला एका भामट्याने 4 लाख 50,000 रुपयांना फसविल्याची घटना या महिन्यात घडली. एका महिलेला एका भामट्याचा फोन आला. त्यानंतर व्हिडियो कॉल आला. आपण दिल्ली पोलिस स्थानकाचा पोलिस अधिकारी असून तुम्ही मनी लाँडरींग प्रकरणात अडकलेल्या असून त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे असल्यास 4,50,000 रुपये अमूक नावाच्या खात्यात अमूक बँकेत पाठवावे लागेल, अशी सूचना दिली. घाबरलेल्या या महिलेने प्रकरणातून सुटत असेन तर बरे होईल, असे समजून 4.5 लाखांची ही रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा केली. आपल्याला अज्ञात व्यक्तीने फसविलेले असल्याची खात्री पटल्यानंतर या महिलेने कोलवा पोलिस स्थानकात तक्रार केली. अशाप्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सध्या घडत आहेत.
दक्षिण गोव्यातील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असे भासवून एका तोतयाने या कंपनीच्या एका प्रतिनिधीला सना एंटरप्राईझेसच्या नावाने एका बँक खात्यात 50 लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त केले व या प्रतिनिधींची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता. या ऑनलाइन फसवणूक प्रकरणात ठाणे-महाराष्ट्र येथील एका आरोपीला गोवा सायबर पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व गुजरात आदी तीन राज्यांमधील खाते या फसवणुकीसाठी जोडले गेले असल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. यामुळे
ऑनलाइन फसवणुकीचे मोठे जाळे असल्याचे दिसून येत आहे. गोवा राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या वेबसाईटवर महिला आणि बालविकास खात्याच्या योजनांची माहिती देणाऱ्या लिंक्सच्या जागी सायबर हल्लेखोरांनी ऑनलाईन कॅसिनो व अन्य विषयांशी संबंधित लिंक अपलोड केल्या आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन गेमिंग संदर्भातील माहिती समोर येते, असे आढळून आले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगार दररोज लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयांची फसवणूक करीत आहेत. काहीजण नकळत तर काहीजण पैशांच्या लोभापायी या फसव्या जाळ्यात अडकतात. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणार नाही, असा निर्धार करणे गरजेचे आहे. तसेच बँकांनी बनावट खात्यांवर कडक नजर ठेवून अशी खाती तत्काळ बंद करण्याची आवश्यकता आहे. अशा उपाययोजनांमुळेच सायबर गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसू शकेल. सायबर गुन्हेगार पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट व्हिडीओ कॉल करून, कुरिअरमधून आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ सापडले आहेत, मनी लॉन्ड्रिंग झाले आहे किंवा तुमच्या बँक खात्याचा गैरवापर झाला आहे, असे आरोप करतात. अशा खोट्या आरोपांद्वारे भीती निर्माण करून कथित चौकशीच्या नावाखाली लाखो रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जातात. हे कॉल्स सहसा अगदी खरे वाटतात आणि याला घाबरून अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवर स्वत:ला गुंतवणूक सल्लागार म्हणविणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडून लिंक पाठविली जाते. शेअर बाजार, क्रिप्टो किंवा अन्य स्कीममध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले जाते. सुरुवातीला कमी रकमेवर चांगला परतावा दिला जातो. त्यामुळे अधिक रक्कम गुंतवली जाते. बनावट वेबसाईट्सद्वारे गुंतवणूक दाखविली जाते. बनावट व्यक्तींचे प्रोफाइल तयार करून संभाषण केले जाते. एकदा का मोठी रक्कम गुंतवली गेली की, नंतर संपर्क तोडला जातो.
ऑनलाइन गेमिंग अॅप्सद्वारे सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून शंभर, पाचशे, हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यातून काढली जाते. ही रक्कम एका खात्यातून इतर दहा, मग शंभर खात्यांमध्ये पाठविली जाते. यापैकी काही खाती बनावट तर काही खाती कमी आर्थिक उत्पन्न गटातील लोकांची असतात. रक्कम काही दिवस या खात्यांमध्ये ठेवली जाते. पुढे ही रक्कम मनी लॉड्रिंगद्वारे कंबोडियामार्गे पाकिस्तान, बांगलादेश, चीनमधील सायबर गुन्हेगारांकडे पाठविली जात असल्याचे एका सायबरतज्ञाचे म्हणणे आहे.
झारखंडमधील जामतारा हे गाव गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांचे प्रमुख केंद्र म्हणून चर्चेत आले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही जामतारा ‘फिशिंगची राजधानी’ म्हणून ओळखली जाते. सन 2015 नंतर या गावातील काही तरुणांनी इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक सुरू केली. हे तरुण, बँक,
टेलिकॉम कंपनी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फोनवरून लोकांकडून ओटीपी, डेबिड कार्ड नंबर, सीव्हीव्ही यासारखी माहिती संकलित करतात. या माहितीचा वापर करून ते बँक खात्यातून पैसे काढतात. जामताऱ्यात 15 ते 25 वयोगटातील तरुण मोबाईल वापरून ओटीपी फसवणूक, केवायसी अपडेट स्कॅम आणि बँक
कॉलिंग स्कॅमसारखे गुन्हे करतात. जामताराव्यतिरिक्त बिहारमधील नवादा, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि राजस्थानमधील भरतपूर ही गावेही सायबर गुन्ह्यांची केंद्रे झाली आहेत, असे समजते. देशातील वाढती बेरोजगारी आणि झटपट पैसा कमाविण्याची मानसिकता यामुळे असले प्रकार घडत आहेत.
गोवा राज्यात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी रायबंदर येथे विभाग सुरू केला असला तरी राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस दल अपुरे पडत असल्याचे दिसून येते. यासाठी तालुकानिहाय पोलिस स्थानके स्थापण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यातील सायबर गुन्हेगारीवर लगाम घालण्याच्यादृष्टीने स्वतंत्र, अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून सायबर गुन्ह्यांचा शोध घेणे, गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. तसेच बँकिंग फसवणूक, ऑनलाइन टास्क स्कॅम, डिजिटल अॅरेस्ट, फेक वेबसाईट्स यांचा तपास जलद व शास्त्रीय पद्धतीने करता येईल. सध्या गोवा राज्यात असलेल्या सायबर क्राईम युनिटला यामुळे तांत्रिक बळकटी मिळण्यास तसेच गुन्ह्यांवरील नियंत्रण शक्य होईल.
सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांना संरक्षण देण्यासाठी गोवा पोलिस सध्या कार्यरत आहे. गोव्यातील शाळा, कॉलेजमध्ये सायबर गुन्हेगारीविषयक जागृती कार्यक्रम संबंधित अधिकाऱ्यांकडून, सायबर तज्ञांकडून सुरू आहेत. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक ठरते. अन्यथा ‘तेले गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे राहिले’, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजेश परब