वादळी पावसाचा पुन्हा तडाखा
मुसळधार कोसळल्याने जलमय परिस्थिती : आजही रेड अलर्ट जारी, अनेक ठिकाणी पडझड : रायबंदर येथे घरात पाणी, पेडणेत सर्वाधिक नोंद
प्रतिनिधी / पणजी
शनिवारी सायंकाळपासून रविवारी दुपारपर्यंत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, रस्ते पाण्याखाली गेले तर काही भागातील घरात पाणी घुसले. राजधानी स्मार्ट सिटी पणजीचे अनेक भाग पुन्हा पाण्यात बुडाले. शहरातील 18 जून रस्त्याचे तर तळेच झाले होते. आज सोमवारपर्यंत हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे, तर मंगळवार 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे शहरांसह ग्रामीण भागातील अनेक रस्ते, साकव, लहान पूल पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील नदी, नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली असून अनेक भागात पाणी तुंबल्यामुळे पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी रस्ता वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पेडणेत सर्वाधिक 210 मिमी नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात पेडणे येथे सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली. केपे आणि सांगे येथे अनुक्रमे 165 मिमी, 162 मिमी पाऊस पडला. सांखळी 137 मिमी, ओल्ड गोवा 133 मिमी, म्हापसा 115 मिमी, काणकोण 112 मिमी, राजधानी पणजी 97 मिमी, मडगाव शहरात 86 मिमी तर मुरगांव येथे 91 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
वीज खात्याची मोठी नुकसानी
अनेक गावात झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने त्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असून रस्ते पाण्याने भरल्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होऊन बसले. रस्ता कुठे, खड्डे कुठे तेच वाहनचालकांना कळत नव्हते. तरी देखील तुंबलेल्या पाण्यातून वाहने कशीबशी काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
रायबंदर - पणजी येथे स्मार्ट सिटीच्या गैरकारभारामुळे एका घरात पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी घरात कधीच पाणी आले नव्हते, असा दावा घर मालकाने केला असून स्मार्ट सिटीच्या कामामुळे हा फटका बसल्याचे त्याचे म्हणणे आहे. गोव्यातील पाऊस इंचाच्या हिशोबात शंभरीच्या दिशेने वाटचाल करीत असून गेल्या 24 तासात सरासरी 6 इंच पाऊस पडला आहे. त्यामुळे एकूण पाऊस 80 इंचाच्या पुढे गेला आहे.
डिचोलीत झाड पडून गाडीत महिला अडकली : चारपैकी तीन जणांना काढले बाहेर : बचावकार्य युध्दपातळीवर सुरू
डिचोली जुन्या बसस्थानकावर अत्यंत जुनाट वडाचे झाड एका गाडीवर पडल्याने गाडीत एक महीला अडकून पडली. या गाडीत एकूण चारजण होते. पैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. गाडी झाडाखाली अडकून राहिल्याने सदर महिलेला बाहेर काढणे कठीण बनले. तिची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
ही घटना काल रवि. दि. 14 जुलै रोजी रात्री 9 वा. च्या सुमारास घडली. जुन्या बसस्थानकावर असलेल्या पेडातील सदर वडाचे अत्यंत जुनाट असे मोठे झाड अचानकपणे सर्वप्रथम रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर पडले. व तसेच खाली उतरत जमिनीवर पडले. याचवेळी या झाडाखाली पार्क करून ठेवण्यात आलेली जीए 03 एन 2200 ही मारूती अरटिगा गाडी झाडाखाली चिरडली. त्यात मुस्लिमवाडा डिचोली येथील मामलेदार कुटूंबातील चार सदस्य होते.
झाड पडताच सर्वत्र गोंधळ उडाला. आजुबाजुला पाहिल्यावर झाडाखाली गाडी अडकल्याचे निदर्शनास आले. लागलीच येथे असलेल्या लोकांनी मदतकार्याला प्रारंभ करून गाडीतील तीन जणांना बाहेर काढले. एक महिला गाडीतच अडकून राहिली. तिला बाहेर काढण्यासाठी रात्री शर्थीचे प्रयत्न सुरू होते. याच झाडाखाली एक रस्सा ऑम्लेट विकणारा झिप्रो नामक युवक हे झाड कोसळत असताना खालीच होता. झाडाचा आवाज ऐकताच त्याने सदर जागेवरून धुम ठोकल्याने तो सुदैवाने बचावला. तसेच अनेकजण त्याच दरम्यान या झाडाखालून गेले होते. तेही सुदैवाने वाचले.
घटनास्थळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार चंद्रकांत शेट्यो, नगराध्यक्ष कुंदन फळारी इतर नगरसेवक दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरच सदर घटना घडल्याने दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान मदतकायृ गुंतले होते. तसेच स्थानिक लोकांकडून मदतकायृ सहकार्य दिले जात होते. घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या गर्दीमुळे तसेच पावसाचा मारा सुऊच असल्याने बचावकायृ अडथळा येत होता. हे झाड हटविण्यासाठी घटनास्थळी तीन जेसीबी यंत्रे मागविण्यात आली होती.