कोल्हापूरातून केवळ 50 मिनिटात गोव्यात ! कोल्हापूर- गोवा विशेष विमान सेवा सुरू झाल्याने प्रवास सुखकर
पहिल्या दिवशीच 46 प्रवाशांनी केला प्रवास : रविवारी पुन्हा कोल्हापुरातून गोव्यासाठी विशेष विमानाची सोय
कोल्हापूर प्रतिनिधी
प्रथमच सुरू झालेल्या कोल्हापूर-गोवा विशेष विमानसेवाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे गुरूवारी कोल्हापूर विमानतळावरून सकाळी 11.30 वाजता टेक ऑफ झालेले विमान केवळ 50 मिंनटात गोव्यात पोहोचले. कोल्हापुरातील 46 प्रवाशी या विमानात होते.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार स्टार एअरलाइन्स या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीने 19 व 22 सप्टेंबर दोन दिवसांसाठी कोल्हापूर-गोवा ही विशेष विमान सेवा सुरू केली आहे. यानुसार गुरूवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावरून गोव्याला विमान गेले. दुपारी 12.20 मिनिटांनी हे विमान गोवा विमानतळावर पोहोचले. कोल्हापुरातील 46 प्रवाशी यामुळे केवळ 50 मिनिटात गोव्यात गेले. 50 सीटचे हे विमान असून गोव्याहून 35 प्रवाशी कोल्हापुरात आले. या सेवेला पहिल्याच वेळी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कोल्हापुरातून रोज गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. सध्या गोव्याला कार, खासगी ट्रॅव्हलर्स अथवा एसटीने जाण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. तसेच कोल्हापुरातून थेट रेल्वेही गोव्याला नाही. कोल्हापूर-ते गोवा विशेष विमानामुळे विनात्रास आणि कमी वेळेत गोव्याला जाणे शक्य झाले आहे. रस्ते खराब असल्याने तसेच घाट परिसर असल्याने वाहने जलद गतीने नेणे शक्य होत नाही. शिवाय प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दोन दिवसांसाठी असणारी कोल्हापूर-गोवा विमान सेवा नियमित सुरू करावी, अशी मागणीही होत आहे.
कोल्हापुरातून रविवारी पुन्हा गोव्याला विमान
कोल्हापूरहून गुरुवारी सकाळी 11.30 वाजता गोव्याला गेलेले विमान दुपारी 12.20 मिनिटांनी गोव्यात पोहोचले. यानंतर दुपारी 2 वाजता हेच विमान गोव्याहून पुन्हा कोल्हापुरात आले. आता रविवारी दि.22 सकाळी 11.15 वाजता कोल्हापूरहून पुन्हा गोव्याला विशेष विमान जाणार आहे. गोव्यातून पुन्हा हेच विमान दुपारी 2 च्या सुमारास कोल्हापुरात येणार आहे. यावेळी प्रवाशांच्या प्रतिसादावर ही विमान सेवा पुढेही सुरू ठेवण्याबाबतच निर्णय घेणार असल्याची माहिती स्टार एअरलाइन्सचे व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांनी दिली आहे.