गोवा मानवाधिकार आयोगाकडून मुख्य सचिव, डीजीपींना नोटिसा
पणजी : गोवा मानवाधिकार आयोगाने हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमधील आगीच्या घटनेनंतर दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेताना मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवले आहे. ही तक्रार 10 डिसेंबर रोजी ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या गोवा युनिटने दाखल केली होती. तक्रारीत 6 डिसेंबरच्या आगीशी संबंधित कथित प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील त्रुटींवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्घटनेत 25 लोकांचा बळी गेला होता. आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष डेस्मंड डी कॉस्टा आणि सदस्य प्रमोद व्ही. कामत यांनी काल गुऊवारच्या बैठकीत या तक्रारीची तपासणी केली. आयोगाने दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्याचे आणि 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारीच्या प्रती मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक या दोघांनाही पाठवण्यात आल्या आहेत, तसेच संदर्भासाठी युनियनला देखील एक प्रत मिळाली आहे.
जमीन मालकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी
हडफडे येथील बर्च नाईट क्लबमधील अग्निकांडप्रकरणी जमीनमालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. बर्च क्लब उभारलेल्या जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर असून त्यांनी ज्येष्ठ वकिल रोहित ब्रास डीसा यांच्यामार्फत राज्य सरकार, नगर नियोजन खाते, हडफडे ग्रामपंचायत, बार्देशचे उपजिल्हाधिकारी, गोवा सीझेडएमए प्राधिकरण, गटविकास अधिकारी, बार्देशचे मामलेदार, टीसीपी खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत संचालनालय, पोलिस अधीक्षक यांच्यासह जमिनीचा करार करण्यात आलेल्या सुरिंदर कुमार खोसला आदींना कायदेशीर नोटिसा पाठवल्या आहेत.