For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात घर नसणाऱ्यांसाठी दिवाळीत खुशखबर! सरकार देणार स्वतःचं घर; फक्त लागणार 'हा' पुरावा

03:50 PM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात घर नसणाऱ्यांसाठी दिवाळीत खुशखबर  सरकार देणार स्वतःचं घर  फक्त लागणार  हा  पुरावा
Advertisement

पणजी : गोव्यात स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारकडून मोठी योजना आणली जाणार आहे. मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेअंतर्गत घर नसलेल्या गोमंतकीयांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दिवाळीच्या काळात या योजनेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जित आरोलकर यांनी या योजनेबाबत माहिती दिली. योजनेसाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्याचे काम सुरू असून, घरांची थेट मालकी देण्याऐवजी ती भाडेपट्ट्याच्या स्वरूपात देण्याचा प्रस्ताव आहे.

घर मिळण्यासाठी 30 वर्षांच्या रहिवासाचा पुरावा

या योजनेचा लाभ केवळ गरजू आणि गोव्यात दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मिळावा, यासाठी कठोर पात्रता निकष ठेवले जाणार आहेत. अर्जदारांना गोव्यात किमान 30 वर्षे वास्तव्य केल्याचा पुरावा सादर करावा लागू शकतो.

Advertisement

गोवा गृहनिर्माण मंडळाकडून ही योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबवण्याचे नियोजन आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पेडणे तालुक्यात घरे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

घर विकता येणार नाही?

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे भाडेपट्ट्याने देण्याचा विचार आहे. एखाद्या लाभार्थ्याने भविष्यात स्वतःचे घर खरेदी केल्यास, योजनेतून मिळालेले घर रिकामे करावे लागेल. त्यानंतर ते घर अन्य पात्र आणि गरजू व्यक्तीला देण्यात येणार आहे.

घरांची मालकी लाभार्थ्यांच्या नावावर केल्यास भविष्यात काही जण घरे विकून आर्थिक फायदा घेऊ शकतात, अशी शक्यता असल्याने सरकारने भाडेपट्ट्याचा पर्याय निवडल्याचे सांगण्यात आले आहे.

कौटुंबिक वादामुळे घरापासून वंचित असलेल्यांनाही मदत

गोव्यात अनेक नागरिक वडिलोपार्जित घरांमध्ये राहत असले तरी कौटुंबिक वादांमुळे त्यांना स्वतंत्रपणे राहण्याची अडचण निर्माण होते. अशा नागरिकांनाही या योजनेचा फायदा होऊ शकतो. स्वतःचे घर खरेदी करण्याची आर्थिक क्षमता निर्माण होईपर्यंत त्यांना स्वतंत्र निवासाची सुविधा मिळावी, हा योजनेमागील एक उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

पेडण्यात 1BHK सदनिकांचा प्रस्ताव

यापूर्वी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात घर नसलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना आणण्याची घोषणा केली होती. ही योजना केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर, मात्र गोव्यासाठी स्वतंत्र स्वरूपात राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पेडणे तालुक्यातील सरकारी जमिनीचे दोन भूखंड या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले असून, येथे 1BHK सदनिका उभारण्याचे नियोजन आहे.

गृहनिर्माण मंडळाचे प्रकल्प संयुक्त भागीदारीत

दरम्यान, गोवा गृहनिर्माण मंडळाने भविष्यातील निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत मंडळाकडून प्रकल्पाची आखणी केली जाईल, तर खासगी भागीदारांकडून बांधकाम केले जाईल.

या प्रकल्पांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर गोव्यातील नवीन जमीन आणि मालमत्ता खरेदी करून भविष्यातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

Advertisement
Tags :

.