गोवा बनलाय इफ्फीचा आत्मा!
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट,तुळशीला जलार्पणाने इफ्फीचा शुभारंभ, तेलगु अभिनेते नंदमुरी यांचा सन्मान
पणजी : गोवा हा इफ्फीचा आत्मा असून गोव्यातील कला संस्कृतीची विविधता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी इफ्फी हे अत्यंत प्रभावी व आदर्श माध्यम आहे, त्याचबरोबर शुटिंगसाठी गोवा हे सर्वात आवडते स्थळ म्हणून जगमान्यता मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. दिमाखदार सोहळ्याने 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे राजधानी पणजीत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुऊगन, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, सौ. राजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, खासदार अश्वेक, केंद्रीय सचिव संजय जाजू, मुख्य सचिव कांडावेलु, महोत्सव संचालक शेखर कपूर, अभिनेते नंदमुरी बालकृष्ण, अनुपम खेर, मनोज जोशी, श्रीलीला, निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, यांच्यासह राज्याचे विविध मंत्री, आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच विविध देशांचे राजदूत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बऱ्याच वर्षांनंतर प्रथमच इफ्फीचा उद्घाटन सोहळा राजधानीत आयोजित करण्यात आला. त्यासाठी गोवा मनोरंजन संस्थेच्या समोर खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात देशविदेशातील प्रतिनिधी, स्थानिक सिनेप्रेमी यांची उपस्थिती होती
इफ्फीमुळे गोव्यात आमूलाग्र बदल
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळे वर्ष 2004 मध्ये गोव्यात इफ्फीच्या आयोजनास प्रारंभ झाला. त्यानंतर वर्ष 2014 मध्ये गोव्याला इफ्फीचे कायमस्वऊपी केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या इफ्फीमुळे गोव्यातही आमूलाग्र बदल झाले असून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सांगितले.
इफ्फीसाठी गोवा हेच योग्य स्थळ
इफ्फीसाठी गोवा हेच कायमस्वऊपी स्थळ का करण्यात आले आहे, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्याचे उत्तर म्हणजे गोव्यात जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा आहेत. गोवा ही पर्यटन आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध भूमी आहे. गोव्याचे श्रृष्टीसौंदर्य जगप्रसिद्ध आहे. एवढेच नव्हे तर गोवा ही कलाकार आणि तंत्रज्ञ यांचीही खाण आहे. या सर्व गोष्टी सिनेनिर्मितीसाठी पोषक व सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. म्हणूनच गोवा हे इफ्फीचे कायम स्वऊपी स्थळ म्हणून योग्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जपान ‘कंट्री ऑफ फोकस’
भारत सध्या चित्रपट निर्मितीत जागतिक क्रमवारीत पोहोचला आहे. यात भारत आणि उर्वरित जग यांच्यात महत्त्वाचा दुवा बनण्याचे काम इफ्फीच्या माध्यमातून होत आहे. यंदाच्या महोत्सवात जपान हा देश ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून गौरविला गेला आहे. गत कैक दशकांपासून जपानी सिनेमांनी जगावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे या महोत्सवात त्यांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण ठरला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिमगोत्सव, कार्निव्हलचे दर्शन
आम्ही इफ्फीला गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा पाईक म्हणून बदलत आहोत. त्याचाच भाग म्हणून यंदा आम्ही गोव्याची संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ, आदरातिथ्य यांचे दर्शन घडविणाऱ्या शिमगा, कार्निव्हल आणि रोमटामेळ यांचे दर्शन घडविले आहे. त्यात गोव्यातील सर्वोत्कृष्ट दहा गटांचा सहभाग होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमच्या गोमंतकीय चित्रपट कलाकार आणि निर्मात्यांमध्ये जबरदस्त प्रतिभा असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यातूनच इफ्फीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी जागतिक स्तरावर ओळख प्राप्त केली आहे.
दि. 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची आशियातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक अशी ओळख आहे. या महोत्सवाने भारत आणि जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट प्रेमी यांना एका व्यासपीठावर आणले आहे. जागतिक चित्रपट, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नवीन प्रतिभेसाठी इफ्फी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करत आहे. यंदाच्या आवृत्तीत भारत आणि विदेशातील समकालीन व क्लासिक चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टरक्लास आणि विशेष कार्यक्रमांची समृद्ध श्रेणी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमुद केले.
सुरुवातीला डॉ. एल. मुऊगन यांनी स्वागत केले. त्यावेळी बोलताना त्यांनी, भारत त्याच्या केसरी अर्थव्यवस्थेच्या समीप पोहोचला आहे, असे सांगितले. दरवर्षी इफ्फी एक नवीन आयाम घेतो. गेल्यावर्षी उद्घाटन सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यंदा विविध राज्यांमधील सांस्कृतिक प्रदर्शने, गोव्यातील 12 तालुके व त्यांच्या समृद्ध परंपरा यांची परेडच्या माध्यमातून चैतन्यशील झलक सादर करून इफ्फीचे भव्य उद्घाटन करण्यात येत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन डॉ. मुऊगन यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती या तीन स्तंभांवर आधारित ऑरेंज इकॉनॉमीवर विशेष भर देण्यात आला आहे असे ते पुढे म्हणाले.
सचिव संजय जाजू यांनी उद्घाटन परेडचे वर्णन करताना, इफ्फी म्हणजे भारताच्या चित्रपट विविधतेचे उत्सव साजरा करणारा कार्निव्हल आहे, असे सांगितले. या सोहळ्यानंतर शिमगा, कार्निव्हल आणि रोमटामेळ यांच्या माध्यमातून आपापल्या कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध राज्ये आणि चित्रपट उद्योगातील रंगीत चित्ररथ यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध तेलगु अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या गौरवशाली सुवर्णमहोत्सवी वर्षांसाठी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यानंतर द ब्ल्यू ट्रेल या शुभारंभी चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडण्यात आला.