महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीरामलढ्याकडून मर्यादापुरुषोत्तमत्वाकडे गोवा !

06:30 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अखिल विश्वातील हिंदु समाजाचा आत्मसन्मान, आत्मस्वर असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या ऐतिहासिक, भव्यदिव्य, अतिपावन प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची 22 जानेवारी 2024 ही तारीख घोषीत झाल्यापासून संपूर्ण देशासह गोव्यातही नवचैतन्य निर्माण झाले आहे. सारा गोवा श्रीराममय होऊ लागला आहे. गोवा ते अयोध्या ही ऐतिहासिक 56 दिवसांची पदयात्राही निघालेली आहे. श्रीरामांच्या मंदिरांसह अन्य देवतांच्या मंदिरामध्येही ‘श्रीराम दिवाळी’ साजरी करण्याची जय्यत तयारी राष्ट्रभावनेने सुरु आहे.

Advertisement

‘गीत रामायण’ द्वारे संपूर्ण रामायणाचे पुन:जागरण होणार आहे. भारतीय राष्ट्रीय आत्मगौरव प्रकटीकरणाच्या या दिवसाची प्रतिक्षा समस्त श्रीरामभक्तांच्या अनेक पिढ्या गेल्या पाचशे वर्षांपासून करत आल्या आहेत. आता भव्य दिव्य मंदिर उभे झाले आहे. त्याचे वर्णन करील तेवढे कमीच वाटावे, पण त्यामध्ये दिव्यांगजनाना सुखमय ठरतील, अशा सुविधाही निर्माण केलेल्या आहेत, हे विशेष! देशाप्रमाणे गोव्याचीही वाटचाल श्रीरामलढ्याकडून मर्यादापुरुषोत्तमत्वाकडे सुरु झाली आहे.

Advertisement

सन 1528 साली मोघल आक्रमक बाबर याने अयोध्येतील श्रीराममंदिराची तोडफोड करुन भारतीय राष्ट्रीय आत्मगौरवाचा घोर अपमान केला. त्याचा बदला घेऊन त्याच ठिकाणी पुन्हा भव्यदिव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी हिंदुंनी तब्बल 74 लढाया लढल्या. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्यानंतर श्रीराममंदिर उभारणीचे स्वप्न साकार होणार असे वाटणे स्वाभाविक होते. पण दुर्दैवाची व घोर लांछनास्पद बाब म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतरही मंदिराचे पुनरुत्थान होण्याचा मार्ग मोकळा झाला नाही. स्वकीय राज्यकर्त्यांशीही एखाद्या समूदायाला स्वत:च्या राष्ट्रीय अस्मितेच्या मंदिरासाठी एवढा दीर्घकाळ संघर्ष करावा लागण्याचे अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराशिवाय दुसरे उदाहरण संपूर्ण जगात कुठे नाही.

“वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने श्रीरामाच्या गुणांचे आचरण करावे. स्वतंत्र भारतातील राजव्यवस्था ही रामाची असावी, म्हणजे रामराज स्थापन करावे”, असे मत महात्मा गांधीजी मांडायचे. मात्र गांधीजींनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, नेमके त्याच्या विरोधातच राज्यकर्त्यांनी काम केले. त्याचा परिणाम असा झाला की तत्कालीन राज्यकर्त्यांची मजल इथपर्यंत गेली की, प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाल्याचा जर दाखलाच नसेल, तर श्रीरामजन्मभूमी कुठली आली? रामसेतु कसा असणार? असे तकलादू सवाल उपस्थित करण्यात आले. म्हणून स्वतंत्र भारतातही श्रीरामभक्तांना आंदोलन करावे लागले. लाठीमार सोसला, प्रसंगी प्राणार्पणही करावे लागले. गोव्यातील श्रीरामभक्तांनीही यात योगदान दिले आणि राष्ट्रीयतेचा हुंकार दाखवून दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक लालकृष्ण अडवाणीजी यांची श्रीराम रथयात्रा, रथयात्रा अडविणारे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव, नंदीग्राम येथून आलेल्या श्रीरामांच्या पादुकांचे पूजन, 1990 मधील पहिली कारसेवा, कारसेवकांवर झालेला निर्दयी लाठीमार, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायसिंह यादव यांच्या आदेशानुसार कारसेवकांवर झाडलेल्या गोळ्या, कारसेवकांच्या रक्ताने लालेलाल झालेली शरयु, 1992 मधील दुसरी कारसेवा, उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्रीपदाचा त्याग करुन कारसेवेत सहभागी झालेले ज्येष्ठ स्वयंसेवक कल्याणसिंहजी, पदाचा त्याग करणाऱ्या कल्याणसिंहजी यांना वंदन करणारे श्रद्धेय अटलजी, कोठारी बंधुंचे बलिदान, वादग्रस्त ढाँचा जमिनदोस्त होणे, श्रीरामल्ला पुन्हा प्रतिष्ठापीत होणे, ज्येष्ठ स्वयंसेवक नरेंद्रजी मोदी यांचे पंतप्रधान बनणे, सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी मंदिर प्रकरणी सलग रोज सुनावणी घेणे, अयोध्या हीच प्रभु श्रीरामचंद्रांची जन्मभूमी म्हणून न्यायालयाने सुस्पष्टपणे मान्य करणे, मंदिर उभारणीचा आदेश मोदी सरकारला देणे, भव्यदिव्य श्रीराममंदिर उभे राहणे, “रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’ हे संघ स्वयंसेवकांनी, कारसेवकांनी प्रभुश्रीरामांना दिलेले वचन पूर्ण होणे... अशा संस्मरणीय घटनांमध्ये गोमतकीयांनीही खारीचा वाटा उचललेला आहे. त्यामुळेच आज गोवा पुन्हा एकदा श्रीराममय होत आहे.

श्रीरामलढ्याकडून मर्यादापुरुषोत्तमत्वाकडे

स्वातंत्र्यानंतरचा तब्बल 77 वर्षांचा श्रीरामजन्मभूमी मंदिराचा इतिहास बालपिढीला शिकविण्याचे कर्तव्य सर्वांचे असून ते पार पाडण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहायला हवे. श्रीरामलढ्यानंतर आता मर्यादापुरुषोत्तमत्वाच्या आचरणाकडे जायचे आहे, त्यातच राष्ट्राचे पुनरुत्थान सामावले आहे. मंदिर झाले म्हणजे ध्येय साध्य झाले, म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही, ही खूणगाठ प्रत्येक राष्ट्राभिमान्याने बांधली पाहिजे. मर्यादापुरुषोत्तमत्व शिक्षणाच्या प्राथमिक स्तरापासून पुढच्या सर्व स्तरातील अभ्यासक्रमात तर समाविष्ट करायला पाहिजेच, पण त्याचबरोबर पालकांनीही ते जाणून घेऊन, स्वत: त्याचे आचरण करुन मुलांना शिकविले पाहिजे. घरातून मिळणारे बालपणातील संस्कार पुढे आयुष्यभर प्रगतशील, सुखी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी मुलांना रोज नवी प्रेरणा देतील. प्रभू श्रीरामांच्या मर्यादापुरुषोत्तमत्वाचा अंगीकार करुन स्वत: घडताना राष्ट्राचेही पुनरुत्थान घडवून आणायचे आहे. समृद्ध, सक्षम, शौर्यवान पिढ्या घडवायच्या आहेत. नवभारताच्या प्रत्येक बालकामध्ये रामतत्व म्हणजे ‘मर्यादापुरुषोत्तमत्व’ आणि प्रत्येक बालिकेमध्ये ‘देवीतत्व’ रुजवायला हवे.

मर्यादापुरुषोत्तमत्व हे शाश्वत, चिरंतन तत्व प्रभू श्रीरामांनी त्यांच्या अवतारकार्यातून समस्त भारतीयांना दिले आहे, त्याचा अंगीकार करुन, आचरण करुन सर्वांना स्वत:ची आणि त्याचबरोबर राष्ट्राची बौद्धिक, मानसिक प्रगल्भता वाढवून परिणामी भारताच्या राष्ट्रीयत्वाचे पुनरुत्थान साध्य करायचे आहे. त्यासाठी मर्यादापुरुषोत्तम या तत्वाचे पुन:जागरण करायचे आहे. हे जागरणाचे कार्य म्हणजेच श्रीरामकार्य सर्वांना करायचे आहे. गोव्यात ते सुरु झाले असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. 22 रोजी गोवा सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीत ‘श्रीराम दिवाळी’च साजरी केल्यास आनंदच प्राप्त होईल. श्रीरामांमधील सहनशीलता, त्याग, करुणा, बंधुता, मित्रता, न्यायपूर्णता, दयाळूपण, वचनबद्धता ज्याच्यामुळे ते मर्यादापुरुषोत्तम गणले गेले, त्या पुरुषोत्तमत्वाच्या आचरणाने समस्त भारतीय समाज समृद्ध होईल.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article