गोव्यात फ्रेंच महिला पर्यटकावर बलात्काराचा आरोप; बंगळुरूच्या आयटी कंपनीच्या सीईओला पणजीत अटक
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी यांची ओळख सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. संशयित आरोपीने महिलेला मांद्रे येथील एका रिसॉर्टमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे मद्यप्राशन केल्यानंतर महिलेच्या संमतीशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितेची मांद्रे पोलिसांत तक्रार
कथित घटनेनंतर पीडित महिलेने मांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण पणजी महिला पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास
पणजी महिला पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संशयित आरोपीला पणजी परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तो गोव्यातून निघून जाण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पणजी महिला पोलिसांकडून सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. आरोपीवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
