गोवा फॉरवर्ड लढणार दहा जागा
अध्यक्ष विजय सरदेसाई यांची माहिती
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किमान दहा जागा लढणार आहे, असे महत्त्वाचे निवेदन विजय सरदेसाई यांनी केले आहे. आपण संपूर्ण गोव्याचे सर्वेक्षण करण्याचे काम एका संस्थेला दिले आहे. या संस्थेकडून पुढील पाच आठवड्यानंतर आपल्याला अहवाल येईल. त्यानंतर त्यांचा अभ्यास करून त्या जागा आपला पक्ष लढविणार आहे. आमच्याबरोबर कोणाला यायचे असेल तर ते येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका या येत्या डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतील. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाचे काम वाढविले आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेला दिसत नाही, मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाने आपले काम सुरू केलेले आहे.
प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास
विजय सरदेसाई यांनी सांगितले की, आपण प्रत्येक मतदारसंघाचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार करतोय. त्यासाठी ज्या संस्थेला प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल तयार करण्यास सांगितले आहे ती संस्था कामाला लागलेली आहे. ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला जिंकण्याची शक्यता आहे, अशाच मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढविणार आहोत. आम्हाला पूर्ण अभ्यास करूनच मग निवडणूक लढवायची आहे.
कोण येतात त्यांना येऊ द्या
आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दहा जागा लढविणे हे उद्दिष्ट आपण समोर ठेवलेले आहे. आमच्याबरोबर ज्या कोणत्या राजकीय पक्षाला यायचे असेल तर त्यांनी अवश्य येऊ द्या, कारण युती किंवा आघाडी हा विषय मी सध्या तरी मानत नाही. अगोदर मला संपूर्ण गोव्याचा पुन्हा एकदा अभ्यास करू द्या.
एक तामिळनाडूचा ‘विजय’ दुसरा गोव्याचा ‘विजय’
तामिळनाडूमध्ये ‘विजय’ नावाच्या व्यक्तीने ज्या पद्धतीने निवडणूक लढविली गोव्याचा ‘विजय’ देखील आक्रमक पद्धतीने निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला कोणत्याही पद्धतीने मोठे यश गाठायची इच्छा आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले. गोमंतकीय जनतेला परिवर्तन हवे आहे. ते परिवर्तन करण्यासाठी ज्यांना आमच्याबरोबर येण्याची इच्छा आहे त्यांनी यावे. आपण पुन्हा एकदा सर्व मतदारसंघांचा दौरा करायचा आहे त्यानंतर आपण आमचे संभाव्य मतदारसंघ निश्चित करणार आहोत. सप्टेंबरपर्यंत आमचे धोरण स्पष्ट होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
पक्षांतर बंदीसाठी प्रयत्न करणार
आगामी निवडणुकीत आमचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ज्यामुळे गोव्याची संपूर्ण देशात बदनामी होते ते म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातील कलमे. या कायद्याला आम्ही आव्हान देत नाही परंतु या कायद्याचा वापर करून प्रत्यक्षात कोणत्याही आमदाराने कायद्याला वाकुल्या दाखवून फसवणूक करू नये यासाठी आम्ही पक्षातर्फे कडक उपाययोजना आमच्या निर्णयाद्वारे घेणार आणि त्यानंतरच आमचा उमेदवार निवडणूक लढवेल. गोव्यात पक्षांतर होऊ नये यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
‘अजेंडा फॉर गोवा’ लवकरच
‘अजेंडा फॉर गोवा’ आम्ही लवकरच तयार करणार आहोत. त्यासाठी अनेक तज्ञांची देखील मदत घेणार, परंतु राजकारणात कुठेतरी आपण जनतेचे सेवक आहोत हे कोणालाही विसरता येणार नाही. जनतेच्या मदतीनेच निर्णय व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न राहतील. त्यासाठी आमचे घोषणापत्र देखील तशाच पद्धतीचे, राहील असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.