गोवा फॉरवर्ड लढविणार विधानसभेच्या 25 जागा!
पणजी : गोवा फॉरवर्ड पार्टीची महत्त्वाची राज्य कार्यकारिणी बैठक काल, सोमवारी पणजीत पार पडली. बैठकीत पक्षाचा विस्तार, आगामी निवडणुकांची रणनीती आणि काँग्रेससोबतची युती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले की, संपूर्ण गोव्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गोवा फॉरवर्ड आगामी निवडणुकीत 25 जागा लढवणार आहे. भाजपचा पराभव करून ‘लोकांचे शासन’ सत्तेवर आणणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, संघटनेचे सरचिटणीस दुर्गादास कामत, सरचिटणीस प्रशांत नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपला हरविणे गरजेचे
विरोधी पक्षातील काही आमदारांनी विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या टीकेला मोहनदास लोलयेकर यांनी प्रत्युत्तर दिले. ‘सरदेसाई यांनी ‘व्होट ऑन अकाउंट’ची मागणी करण्यासाठी विधानसभेत थांबण्याचा घटनात्मक निर्णय घेतला होता. विधानसभेचे कामकाज लवकर गुंडाळले जाईल, हा त्यांचा अंदाजही खरा ठरला,’ असे लोलयेकर म्हणाले. विरोधकांमध्ये फूट पाडण्यापेक्षा भाजपला हरवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.