गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदासाठी कायतान फर्नांडिस आणि वालांका आलेमांव यांच्यात लढत
अध्यक्षपदासह तीन उपाध्यक्ष, खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड या निवडणुकीतून होणार आहे. महिला उपाध्यक्षपदासाठी वालांका आलेमांव आणि काजोल मंगेशकर यांच्यात थेट लढत होणार आहे. सदस्यपदाच्या महिला प्रतिनिधीसाठी काजोल मंगेशकर यांची एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त आहे.
दोन पुरुष उपाध्यक्षपदांसाठी अँड्र्यू फॅर्राव, अँथनी पांगो, बाबली मांद्रेकर आणि फ्रान्सिस फर्नांडिस हे उमेदवार रिंगणात आहेत. खजिनदारपदासाठी रवींद्र जोस काब्राल आणि शुबर्ट फुर्तादो यांच्यात सामना होणार आहे.
जीएफए कार्यकारिणीवरील सदस्यपदांसाठी अँथनी लिओ फर्नांडिस, कॉन्स्तानसियो रॉड्रिग्ज, कॉन्स्तानतिनो कायादो, कॉज्मे ओलिव्हेरा, जॉन परेरा, लक्ष्मण हडफडकर, लॅविनो अँथनी परेरा, मनोज केणी, पॅटिसियो डिसोझा, सावियो मिस्कीता, सॅवेरिन फर्नांडिस आणि उदय लिंगुडकर असे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अध्यक्षपदासाठी दोन प्रमुख उमेदवार आमनेसामने असल्याने या निवडणुकीकडे गोव्यातील फुटबॉल क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 158 पात्र क्लबच्या मतदानातून जीएफएच्या आगामी नेतृत्वाची निवड होणार आहे.