लाँग वीकेंड; गोव्याची विमानतिकिटे चारपट महाग
पणजी : गांधी जयंतीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात ‘लाँग वीकेंड’साठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. मात्र, वाढलेल्या मागणीचा परिणाम विमान तिकिटांच्या दरांवर झाला असून अनेक प्रमुख मार्गांवरील भाडे नेहमीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गोव्याला येणाऱ्या तसेच सुट्टीनंतर परतणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
चेन्नई-गोवा मार्गावर नेहमीचे सुमारे 5,300 रुपये असलेले भाडे गुरुवारी सुमारे 10,600 रुपये झाले. तर रविवारी गोव्याहून चेन्नईला परतण्यासाठी साधारण 4,500 रुपयांचे तिकीट सुमारे 18,400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
बंगळुरू-गोवा मार्गावरही मोठी वाढ दिसून येत आहे. नेहमी सुमारे3,700 रुपये असलेले भाडे सध्या 9,400 रुपये, तर रविवारी ते सुमारे 13,800 रुपये होण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद-गोवा मार्गावरील नियमित भाडे साधारण 5,700 रुपये असताना गुरुवारी ते 10 हजार रुपये आणि रविवारी सुमारे 10,400 रुपये राहण्याची शक्यता आहे. हैदराबाद-गोवा मार्गावरही नेहमीच्या 3,700 रुपयांच्या तुलनेत गुरुवारी भाडे 7,500 रुपये, तर रविवारी परतीच्या प्रवासासाठी ते सुमारे 9 हजार रुपये झाले आहे.
सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवासाची मागणी वाढल्याने तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. वाढती मागणी, पीक सीझन आणि विमान इंधनाच्या दरांतील चढ-उतार यांचा परिणाम विमानभाड्यांवर होत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लाँग वीकेंडला गोव्याला येण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांना वाढीव विमानभाड्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.