मांडवीच्या पाण्यावर सौर क्रांती! पणजीत उभारणार 3.6 मेगावॉटचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प
पणजी : त. भा. संदीप कांबळे : गोव्याला हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पणजी शहराच्या बॅकवॉटर परिसरात 3.6 मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (Floating Solar Project) उभारण्याची तयारी वीज खात्याने पूर्ण केली आहे. पाण्याच्या पृष्ठभागाचा वापर करून वीज निर्मिती करणारा हा गोव्यातील पहिला मोठा प्रकल्प ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर’ योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी तांत्रिक तसेच पर्यावरणविषयक मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष कामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॅटरी स्टोरेजमुळे रात्रीही वीजपुरवठा
या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम. दिवसा सौर पॅनेलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज साठवून ठेवण्यात येणार आहे. विजेची मागणी वाढणाऱ्या संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळेत ही साठवलेली वीज ग्रीडमध्ये सोडली जाईल. त्यामुळे पणजी आणि परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
65 मेगावॉट रूफटॉप सोलरचे लक्ष्य
गोवा सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षात ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’अंतर्गत 65 मेगावॉट क्षमतेची रूफटॉप सौर यंत्रणा उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. निवासी ग्राहकांना 10 किलोवॉटपर्यंतच्या सौर यंत्रणेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त योजनेतून 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
तसेच राज्यातील सुमारे 383 सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातील अंगणवाड्या आणि ग्रामपंचायती सौर ऊर्जेवर आणण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
धरणांवरही फ्लोटिंग सोलरची योजना
गोव्यात जमिनीची उपलब्धता मर्यादित असल्याने सौर ऊर्जा निर्मितीसाठी जलाशयांचा वापर करण्यावर सरकारचा भर आहे. साळावली, चापोली, आमठाणे आणि अंजुणे यांसारख्या प्रमुख धरणांवर टप्प्याटप्प्याने 197 मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासह 2050 पर्यंत ‘नेट झिरो’चे उद्दिष्ट गाठण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे सांगितले. तरंगते सौर, कॅनॉल-टॉप आणि रूफटॉप सोलर तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही हा प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आणि विजेचा पुरवठा अधिक सुरळीत करण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले. पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी या हरित उपक्रमाचे स्वागत केले आहे.