गोवेकरांना मोठा दिलासा! वीज दंडापोटी वसूल केलेले 43 कोटी रुपये सरकार परत करणार
1 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे अनेक ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ झाली होती. याबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने दंड रद्द करण्याचा आणि वसूल केलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंमलबजावणीत हलगर्जीपणा झाल्याची कबुली
या प्रणालीच्या अंमलबजावणीत सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्य केले. त्यामुळे ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिले मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना झालेला त्रास लक्षात घेऊन दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वसूल केलेली रक्कम परत करण्यापूर्वी संबंधित प्रकरणांची पडताळणी केली जाणार आहे.
मंजूर भारापेक्षा जास्त वापरावर आकारला जात होता दंड
वीज जोडणी घेताना ग्राहकाने मंजूर करून घेतलेला भार आणि प्रत्यक्षात वापरला जाणारा भार यामध्ये फरक असल्यास दंड आकारला जात होता. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाची वीज जोडणी ३ केव्हीए क्षमतेची असताना त्याचा प्रत्यक्ष वापर 5 केव्हीएपर्यंत पोहोचल्यास अतिरिक्त भाराच्या आधारे दंड आकारला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.
भविष्यातील तक्रारी टाळण्यासाठी उपाययोजना
भविष्यात अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी वीज विभागाला भार पडताळणी प्रक्रिया अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ग्राहकांचा मंजूर भार, प्रत्यक्ष वीज वापर आणि बिलिंग यामध्ये योग्य समन्वय राखण्यावर भर दिला जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे वीज दंड भरावा लागलेल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, संबंधित ग्राहकांना परतावा कधी आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे मिळणार, याबाबतची सविस्तर माहिती वीज विभागाकडून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
