For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात प्रतिभेची, वाचकांची उणीव नाही

12:12 PM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात प्रतिभेची  वाचकांची उणीव नाही
Advertisement

शिक्षण खाते सचिव प्रसाद लोलयेकर यांचे प्रतिपादन : ‘गोवा पुस्तक महोत्सव’ कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Advertisement

पणजी : गोवा राज्य म्हणा किंवा गोव्यातील लोक केवळ संस्कृतीप्रिय आहेत, असे म्हणून चालणार नाही. गोव्यातील लोकांमध्ये प्रतिभाही ठासून भरलेली आहे. त्यामुळे देशातील सर्वात लहान राज्य असूनही देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात प्रतिभावंत माणसं सापडतात. त्यांनी गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राज्यातील लोकांमध्ये जशी प्रतिभेची उणीव नाही, तशी वाचकांचीही नाही, असे उद्गार गोवा राज्य शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस) यांनी काढले. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहकार्याने गोव्यात 4 ते 8 फेब्रुवारी 2026 या दरम्यान ‘गोवा पुस्तक महोत्सव 2026’ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिव लोलयेकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष तसेच दै. तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, डॉ. केशव बळिराम हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास सतरकर, इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, तरुण भारतच्या कार्यकारी संचालिका सई ठाकुर बिजलानी व संपादक सागर जावडेकर उपस्थित होते.पुस्तक वाचनाची गरज  सचिव प्रसाद लोलयेकर पुढे म्हणाले, लहान मुलांमध्ये आपण मिळून मिसळून रहायला हवे. कारण आपण नकळतपणे लहान मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना त्या करू नयेत यासाठी आग्रही असतो. परंतु लहान मुलांच्या प्रतिभेचा आविष्कार जाणून घ्यायला हवा. आज आपण वाचनाची गरज आहे, असे प्रत्येकवेळी सांगत असतो. परंतु वाचकांबरोबरच लेखकांनाही पुस्तके वाचायची गरज आहे, असेही लोलयेकर यांनी सांगितले.

Advertisement

वाचनसंस्कृतीसाठी सामूहिक प्रयत्न : सतरकर

मुख्याध्यापक सतरकर म्हणाले, भारताची ज्ञान परंपरा वाढण्यासाठी मुलांची वैचारिकता वाढणे महत्त्वाचे आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करायला हवेत. ही जबाबदारी केवळ एकट्याची नसून प्रत्येकाची आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व्हावी, यासाठी मी स्वत: तिसरी आणि सहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांशी अभ्यासातील धड्यांशिवाय अवांतर वाचनाविषयी चर्चा केली. त्यामध्ये असे दिसून आले की, मुलांशी केवळ पाठ्यापुस्तकांबाबतच संवाद साधून चालणार नाही. त्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून दिल्यास ते निश्चितच पुस्तकांकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संपादक सागर जावडेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, ‘गोवा पुस्तक महोत्सव 2026’ हा केवळ महोत्सव नसून, हा एक वाचन सोहळा आहे. पुस्तकांचे आपण जर वाचनच करणार नाही, तर एखाद्या विषयातील दुसरी बाजू कळणार नाही. त्यासाठी हा गोवा पुस्तक महोत्सव हा निश्चितच वाचकांसाठी ऐतिहासिक ठरेल, असेही ते म्हणाले.

पुस्तक महोत्सव ठरेल ऐतिहासिक : किरण ठाकुर

पूर्वी ज्ञान हे मेंदूत साठवले जायचे. हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होते. आता हा प्रवास एआय माध्यमापर्यंत पोहचून धुमाकूळ घालत असला तरीही वाचकांची संख्या कमी नाही, हे आम्ही पुणे येथील संमेलनातही अनुभवले आहे. असाच एक प्रयोग गोव्यातही ऐतिहासिक स्वऊपात व्हावा, यासाठी ‘गोवा पुस्तक महोत्सव 2026’ हा महोत्सव होत आहे. वाचनवाढीसाठी किंवा काय वाचावे, यासाठी हा पुस्तक महोत्सव ऐतिहासिक ठरेल, असा ठाम विश्वास किरण ठाकुर यांनी व्यक्त केला.

‘गोवा पुस्तक महोत्सवा’तील महत्त्वाच्या बाबी

  •  या महोत्सवात सुमारे 2 ते 3 लाख नागरिक उपस्थित राहतील.
  •  या महोत्सवात सुमारे 4 भाषांतील लाखो पुस्तके असतील.
  • गोवा पुस्तक महोत्सवामुळे मिळेल गोमंतकीयांना ‘माझा उत्सव’ मान्यता.
  • गोव्यातील खाद्यपदार्थ व इतर कलाकुसरींचे 300 स्टॉल असतील.
  • लहान मुलांसाठी विशेष दालनाची सोय करण्यात येईल.
  • व्याख्याते, लेखक, साहित्यिक यांच्यासाठीही विशेष दालने.
  • गोव्याचे साहित्यिक, व्याख्यात्यांच्या सन्मानासाठी भव्य दालन.
Advertisement
Tags :

.