राज्यात दिवाळीची खमंग, आनंददायी धामधूम ! मिठाईचे आकर्षक बॉक्सेस अन् घरगुती फराळाच्या सुवासाने सजले पणजी मार्केट
संदीप कांबळे
पणजी: 'फराळाचा खमंग सुवास, दारात पणत्यांचा प्रकाश आणि सोबतीला मिठाईचा गोडवा...' प्रकाशपर्व आणि आनंदाचा सण असलेली दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजधानी पणजीसह गोव्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील बाजारपेठा पूर्णपणे दिवाळीच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. उत्तर गोव्यापासून ते पार दक्षिण गोव्यापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून संपूर्ण राज्य दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रे असलेल्या शहरांमध्ये मोठी उलाढाल होत आहे. म्हापसाच्या प्रसिद्ध शुक्रवार मार्केटमध्ये आणि मडगावच्या मुख्य बाजारपेठेत ग्राहकांची पावले खरेदीसाठी मोठ्या संख्येने वळत आहेत. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडा शहरातही पूजेचे साहित्य आणि दिवाळी साहित्याची दुकाने सजली आहेत. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या डिचोली, सांखळी आणि बेट दक्षिण टोकाला असलेल्या काणकोण शहरांमधील स्थानिक बाजारपेठांमध्येही ग्रामीण जनतेने खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदाच्या दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे पणजी मार्केटसह म्हापसा आणि मडगावच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला अस्सल घरगुती फराळ, नोकरी करणाऱ्या महिला आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली घरच्या घरी फराळ बनवणे अनेकांना शक्य होत नाही. हीच गरज ओळखून स्थानिक महिला बचत गट आणि गृहउद्योजकांनी तयार केलेला ताजा फराळ बाजारात दाखल झाला आहे.
यामध्ये कुरकुरीत चकल्या, तोंडात विरघळणारे लाडू, खमंग चिवडा, करंज्या, शेव आणि शंकरपाळ्या अशा पदार्थांचा समावेश आहे. 'घरचीच चव' असल्यामुळे या घरगुती फराळाचे रेडिमेड पॅकेट्स गोवेकरांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
जनतेच्या बजेटनुसार विविध पर्याय उपलब्ध
दिवाळीत एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा असल्याने राज्यातील सर्वच मिठाईच्या दुकानांमध्ये सध्या कमालीची लगबग आहे. व्यापाऱ्यांनी दिवाळीनिमित्त खास डिझाइन केलेले, आकर्षक आणि कलाकुसर असलेले मिठाईचे बॉक्सेस तयार केले आहेत. काजू कतली, मोतीचूर लाडू, आणि ड्रायफ्रूट्सच्या खास पॅकिंगला कों पर्पोरेट गिफ्टिंग आणि नातेवाईकांसाठी मोठी मागणी आहे. दुकानदारांनी सर्वसामान्य जनतेच्या बजेटनुसार विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
आकाशकंदील, मातीच्या पणत्या अन् रांगोळीने बाजारपेठ सजली
पणजी, म्हापसा, मडगाव आणि फोंड्याच्या मुख्य चौकात पाऊल ठेवताच डोळे दिपवणारे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत पारंपरिक कागदी आकाश कंदिलांपासून ते आधुनिक कापडी आणि इको-फ्रेंडली आकाशकंदिलांचे शेकडो प्रकार टांगलेले दिसत आहेत. तसेच घराच्या अंगणात लावण्यासाठी पारंपरिक मातीच्या पणत्या, डिझायनर पणत्या आणि दारात काढण्यासाठी लागणारी विविध रंगांची दर्जेदार रांगोळी व रांगोळीचे छापे खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची मोठी झुंबड उडाली आहे.
साखळी, डिचोली आणि काणकोणमध्ये स्थानिक कुंभारांनी आणलेल्या मातीच्या पणत्यांना विशेष पसंती मिळत आहे. व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण गेल्या काही दिवसांतील ट्रॅफिक जॅम आणि पावसाच्या सावटानंतर आता संपूर्ण गोव्यातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची पावले वळू लागल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील दोन-तीन दिवस ही गर्दी अशीच कायम राहील आणि यंदाची दिवाळी व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठीही आनंदाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
