म्हापसा कदंब बसस्थानकावर एफडीएचा छापा; २२५ किलो जामून, १०० किलो मावा जप्त
म्हापसा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत म्हापसा कदंब बसस्थानकावर परराज्यातून आलेला २२५ किलो जामून आणि १०० किलो मावा जप्त केला. निकृष्ट दर्जाचा आणि आवश्यक माहिती नसलेला हा माल पुण्याहून गोव्यात विक्रीसाठी आणण्यात आला होता.
एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून परराज्यातून गोव्यात येणाऱ्या बसवर विशेष नजर ठेवण्यात येत होती. तपासणीदरम्यान संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या जामून आणि माव्याच्या पॅकेटवर उत्पादन किंवा वापराची तारीख नमूद नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामून पुण्याहून गोव्यात विक्रीसाठी आणण्यात आला होता. वागातोर येथील एका व्यक्तीने हा माल एका हॉटेलच्या पत्त्यावर मागवला होता. मात्र संबंधित हॉटेल मालकाकडे या मालाच्या व्यवहारासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले.
जामूनचा वापर आईस्क्रीम, बर्फ तसेच कॉकटेल आणि अन्य थंडपेय तयार करण्यासाठी केला जात असल्याचे आढळून आले. संबंधित हॉटेलमधून हा माल इतर हॉटेल्सनाही पुरवला जात असल्याची माहिती तपासात समोर आली.
दरम्यान, सणासुदीच्या काळात पेढे, मोदक आणि अन्य मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माव्याचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकेजिंग, उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि इतर आवश्यक माहिती तपासावी, असे आवाहन एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी केले.
एफडीए संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अमित मांद्रेकर, डार्लन दिवकर, राम धुरी तसेच कर्मचारी संदीप शेळके आणि सुधाकर पार्सेकर यांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या जामून आणि माव्याची म्हापसा पालिकेच्या सहकार्याने विल्हेवाट लावण्यात आली.