For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोवा क्राइम ब्रँचच्या पोलीस निरीक्षकावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप; डीजीपींचे कठोर कारवाईचे आदेश

03:38 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा क्राइम ब्रँचच्या पोलीस निरीक्षकावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप  डीजीपींचे कठोर कारवाईचे आदेश
Advertisement
पणजी : गोव्यातील पोलीस दलाला धक्का देणारे गंभीर प्रकरण समोर आले आहे. उत्तर गोवा क्राइम ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षक यांच्यावर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेचाही सहभाग असल्याचा आरोप असून, दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोव्याचे पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांनी पोलीस दलात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस विभागाचे गैरवर्तनाबाबत शून्य-सहिष्णुता (Zero Tolerance) धोरण असून, संबंधित पोलीस निरीक्षक आणि अन्य आरोपीविरोधात कायदेशीर तसेच विभागीय कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दोन वेगवेगळ्या दिवशी अत्याचार केल्याचा आरोप

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कथित घटना 25 जुलै आणि 27 ऑक्टोबर 2026 रोजी रायबंदर येथील क्राइम ब्रँच कार्यालयात घडल्या. संबंधित अल्पवयीन मुलीने सुरुवातीला चाइल्ड हेल्पलाइनकडे तक्रार केली होती. ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर मुलीने पोलीस निरीक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.

या कथित घटनांमध्ये महिलेने मदत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे.

BNS आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (लैंगिक छळ) आणि 127 (बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे), तसेच POCSO कायद्याच्या कलम 10 (गंभीर स्वरूपाचा लैंगिक अत्याचार) आणि कलम 12 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

कथित घटना क्राइम ब्रँच कार्यालयाच्या परिसरात घडल्याने या प्रकरणाचा तपास जुने गोवा पोलीस ठाण्याकडे (Old Goa Police Station) सोपविण्यात आला आहे. संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

पोलीस दलातील गैरवर्तन खपवून घेणार नाही : डीजीपी

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डीजीपी आलोक कुमार यांनी पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरवर्तनात सहभागी असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणातही कायदेशीर तपासासोबत विभागीय कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आता तपासातून नेमकी काय माहिती समोर येते आणि संबंधितांवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.