For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ६४ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; वेदांता उत्कर्ष शिष्यवृत्तीचे वितरण

01:03 PM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत यांच्या हस्ते ६४ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव  वेदांता उत्कर्ष शिष्यवृत्तीचे वितरण
Advertisement

सांखळी : शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेडच्या वतीने सांखळी येथील रवींद्र भवन येथे ‘वेदांता उत्कर्ष शिष्यवृत्ती’ सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कंपनीच्या सीएसआर उपक्रम ‘वृद्धी’ अंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Advertisement

या कार्यक्रमात अमोणा, नावेली आणि सांखळी परिसरातील 64 गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी पालीचे जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, नावेली ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण गावस, आमोणा ग्रामपंचायतीचे सरपंच वसंत सिनारी, व्हीआयएसएल-व्हिएपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसांता गांगुली, व्हीआयएसएलच्या सीएसआर प्रमुख लीना वेरेणकर तसेच कंपनीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेडचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या भविष्यात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘वेदांता उत्कर्ष शिष्यवृत्ती’ उपक्रमाला सुरुवात झाल्यापासून गेल्या सुमारे नऊ वर्षांत विविध राज्यांतील जवळपास 40 दुर्गम गावांमधील सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. नुकतेच महाराष्ट्रातील वझरे येथील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कंपनीच्या ‘वृद्धी’ प्रकल्पांतर्गत शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 4 अर्थात ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या उद्दिष्टाशी जोडलेले आहेत. शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा, प्रशिक्षण कार्यशाळा आणि डिजिटल शिक्षणासाठी सहाय्य अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कंपनीकडून शिक्षण क्षेत्राला पाठबळ दिले जात आहे.

विद्यार्थ्यांना सक्षम, स्वावलंबी आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement
Tags :

.