For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यापासून पणजीत गोवा पुस्तक महोत्सव

10:13 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्यापासून पणजीत गोवा पुस्तक महोत्सव
Advertisement

‘एनबीटी’, लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशन,  समर्थ युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

Advertisement

पणजी : राजधानी पणजीत होणाऱ्या गोवा पुस्तक महोत्सवाची जय्यत तयारी झालेली आहे.देशपातळीवरील लेखक, साहित्यिक, वाचक, महनीय व्यक्ती या सर्वांच्या साक्षीने सुमारे 2 लाख लोकांच्या सहभागाने गोवा पुस्तक महोत्सव 2026 पार पडणार आहे. हा महोत्सव बुधवारी 4 ते रविवारी 8 फेब्रुवारी या दरम्यान भाऊसाहेब दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा गोवा पुस्तक महोत्सव नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (एनबीटी) यांच्याद्वारे लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशन तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने होणार आहे, अशी माहिती एनबीटीचे संचालक युवराज मलिक यांनी दिली.

पणजी येथील हॉटेल सूर्यकिरण येथे काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालक मलिक बोलत होते. यावेळी लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर उपस्थित होते. गोवा पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर, गोवा राज्य शिक्षण विभागाचे सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस), नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे संचालक युवराज मलिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Advertisement

लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले की,देशभरात वाचनसंस्कृती वाढवण्याच्या एनबीटीच्या उद्दिष्टानुसार गोवा बुक फेस्टिव्हलला राष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचा विचार केला जात आहे. इतर राज्यांतील मोठ्या पुस्तक मेळ्यांप्रमाणे हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम मोफत असून सर्वांसाठी खुले आहेत. समाजाला पुन्हा एकदा पुस्तकांच्या महत्त्वाशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

गोवा हे साहित्य पर्यटन केंद्र बनेल

गोवा बुक फेस्टिव्हलमध्ये साहित्यिक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी खास कार्यशाळा आयोजित केल्या जातात. हा महोत्सव गोव्याच्या जनतेचा आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे तो गोव्याची सर्जनशीलता, संस्कृती आणि समृद्ध परंपरा साजरी करतो. येत्या एक ते दोन वर्षांत गोवा बुक फेस्टिव्हलमुळे गोवा हे भारतातील एक महत्त्वाचे साहित्य पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे एनबीटीचे संचालक मलिक यांनी सांगितले.

‘गोवा : प्रकाश आणि आनंदाच्या कथा’

पुस्तक महोत्सवात ‘गोवा : प्रकाश आणि आनंदाच्या कथा’ नावाचे एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गोव्याच्या नामवंत कलाकारांच्या प्रातिनिधिक कलाकृती सादर केल्या जातील. ज्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने प्रकाशित केलेल्या मुलांसाठीच्या अनेक अभिजात पुस्तकांच्या निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. हे प्रदर्शन एनबीटीच्या ‘स्टोरीज ऑफ लाईट अँड डिलाईट’ आणि ‘गोवा’ या शीर्षकांच्या अनुक्रमे मारिओ मिरांडा आणि शशी शेट्यो यांच्या कलाकृती सादर होतील.

पुस्तकांपेक्षाही अधिक : प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एक महोत्सव

पुस्तकांच्या पलीकडे, पुस्तक महोत्सव आकर्षक अनुभव देतो जे वाचकांना सहभागी होण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करत आहेत .तरुण वाचकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते ज्यामध्ये मुलांसाठी शिकण्यासोबत मजेदार क्रियाकलापांचा समावेश आहे, ज्यामध्ये कठपुतळी आणि संगीतमय कथाकथन सत्रांसह कथाकथन, माती कला कार्यशाळा, कार्टून बनवण्याच्या कार्यशाळा, पोस्टर आणि बुकमार्क बनवणे, घोषवाक्य लेखन, कथा रंगभूमी, रेखाचित्र कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, लोकनृत्य सादरीकरण आणि ‘राऊंड द रिडल’ सारखे परस्परसंवादी सत्रे समाविष्ट आहेत, हे सर्व कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आणि वाचनाची आजीवन आवड जोपासण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.

‘लेखक मंचावर’ साहित्यिकांची सत्रे 

‘लेखक मंचावर’ साहित्यिक सत्रांची  आकर्षक मालिका आयोजित केली जाणार आहेत. संपूर्ण भारतातील प्रसिद्ध लेखक, पत्रकार, विचारवंत आणि सर्जनशील व्यक्ति भाषणे, संवाद आणि चर्चांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतील. गोवा पुस्तक महोत्सवातील साहित्यिक सत्रांमध्ये लेखक, कलाकार आणि विचारवंतांची  मांदियाळी पाहायला मिळेल. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उदय माहूरकर, प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अविका गौर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, एसी, भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक आणि अंतराळवीर लेखक आणि राजकीय विश्लेषक शांतनू गुप्ता, चित्रपट निर्माते आणि विद्वान चंद्रप्रकाश द्विवेदी, इतिहासकार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मोहन शेट्यो, विदुषी आणि लेखिका मेधा खासगीवाले, पत्रकार, माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर; कायदेतज्ञ आणि लेखक सुमंत बत्रा, अभिनेता अमोल पाराशर, चित्रपट निर्माते सचिन पिळगावकर, प्रसिद्ध मराठी लेखक, तत्त्वज्ञ सदानंद श्रीधर मोरे, लेखक, कवी व तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांचा समावेश आहे.

पुस्तक महोत्सवातील महत्त्वाच्या बाबी

  • ‘अॅन ओशन ऑफ स्टोरीज’ या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव 2026 देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक आणि विचारवंतांना आणणार एकत्र.
  • महोत्सवात प्रवेश विनामूल्य आहे आणि अभ्यागतांना सर्व पुस्तकांवर 10 टक्के सवलत देण्यात येणार असून, हा महोत्सव दररोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत राहणार खुला.
  • या महोत्सवात 100 हून अधिक प्रकाशकांचे 200 पुस्तकांचे स्टॉल्स असतील, ज्यात इंग्रजी, कोंकणी, मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील विविध पुस्तकांचे भरणार प्रदर्शन.
  • गोव्यातील बाल साहित्य चित्रप्रदर्शन, सरदार पटेल आणि वंदे मातरम् 150 याबाबत भरणार प्रदर्शने
  • गोवा पुस्तक महोत्सवाला देशभरातील किमान 2 लाख लोकांची राहणार उपस्थिती.
Advertisement
Tags :

.