पणजीमध्ये फेब्रुवारीत गोवा पुस्तक महोत्सव
पणजी : पणजीत 4 ते 8 फेब्रुवारी या दरम्यान गोवा पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा राष्ट्रीय महोत्सव नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्यातर्फे होणार असून, याला लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन आणि एनबीटी प्रकल्पाचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी दिली. पणजीत काल गुऊवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठे यांनी गोवा पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी गोवा विद्या प्रबोधिनीचे प्राचार्य भूषण भावे, डॉ. केशव बळिराम हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास सतरकर उपस्थित होते.
मराठे यांनी सांगितले की, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सव आयोजित केले जातात. दिल्ली, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील महोत्सव आयोजित केले. आता त्याच धर्तीवर गोव्यातही हा पुस्तक महोत्सव होत आहे. यामध्ये गोमंतकीय लेखकांबरोबरच देश-विदेशातीलही लेखकांना, साहित्यिकांना सामावून घेतले जाणार आहे. या महोत्सवानिमित्त गोमंतकीय खाद्य संस्कृती, वाचन संस्कृती, याशिवाय आर्टकला आदींचाही समावेश राहणार आहे.
‘ओशन ऑफ स्टोरीज’
गोव्यात होणाऱ्या या महोत्सवासाठी आता ‘ओशन ऑफ स्टोरीज’ (समुद्री कथा) असे बोधचिन्ह वापरण्यात आलेले आहे. या महोत्सवात सुमारे 2 हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध असतील. त्याशिवाय राष्ट्रीय ई पुस्तकालय ह्या अॅपचा वापर करून सरकारतर्फे लाँच करण्यात आलेल्या पुस्तकांचाही डिजिटल पद्धतीने महोत्सवात वापर करण्याची सोय करण्यात येणार आहे. या महोत्सवात सुमारे 22 भाषांतील पुस्तके असतील. त्याचबरोबरच ऑडियोद्वारेही पुस्तके सहभागींना ऐकता येतील, असे मराठे यांनी सांगितले. या महोत्सवाचे वैशिष्ट्या म्हणजे ‘दोन लेखक मंच’ हा स्वतंत्र कक्ष असणार आहे. यामध्ये किमान 100 जणांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. यामध्ये दररोज सात याप्रमाणे पाच दिवसांत 35 लेखकांचे कार्यक्रम होतील. यामध्ये गोव्याबाहेरील लेखकांचाही समावेश आहे, असे मिलिंद मराठे यांनी सांगितले. याशिवाय गोव्यातील पुस्तक महोत्सवात चिल्ड्रन बुक, आर्ट बुक, लहान मुलांसाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध असणार आहेत. कार्यक्रमाची तयारी आणि आखणी याला सुरूवात करण्यात आली असून, याबाबतची तपशीलवार माहिती नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे जाहीर केली जाईल, असेही मिलिंद मराठे यांनी सांगितले. प्राचार्य भूषण भावे यांनी या गोवा पुस्तक महोत्सवाचा उद्देश आणि त्याची माहिती पत्रकारांना दिली.