वाचनसंस्कृतीला ऊर्जा देणारा गोवा पुस्तक महोत्सव
गोव्यात नुकताच झालेला राष्ट्रीय पुस्तक महोत्सव ऐतिहासिक ठरला. गोव्यात वर्षभर विविधांगी महोत्सव होतात, ज्यामध्ये काजूपासून आंबा, नारळ, फळ ते मासळीपर्यंत आणि नाटकापासून चित्रपट अशा विविधांगी महोत्सवांचा समावेश असतो. संगीत संमेलने, साहित्य संमेलने, नाट्यासंमेलने, कीर्तन संमेलनांसह अनेक उर्जावान संमेलनेही होतात. सरकारी तसेच खासगी पातळीवरील अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा होतात. अशा या महोत्सवांमुळे गोव्यातील वातावरण नेहमी उत्साही असते, त्यात अधूनमधून येणाऱ्या सण उत्सवांचाही उत्साह असतोच. अशाच प्रकारे गोव्यातील साहित्य, पुस्तक जगताला नवी उभारी देणारा गोवा पुस्तक महोत्सव आपला वेगळा ठसा ठेवून गेला.
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचा हा पुस्तक महोत्सव गोव्यात व्हावा, यासाठी डॉ. किरण ठाकुर यांनी पुढाकार घेतला आणि तो गोव्यात यशस्वी करुन दाखविला. एनबीटी, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन आणि डॉ. ठाकुर यांच्या टीमवर्कमुळे महोत्सव सुफळसंपूर्ण झाला. गोव्यात साहित्य संमेलने अनेक होतात, त्यात पुस्तकांवर चर्चा होते आणि पुस्तक प्रदर्शनेही भरतात. वर्षभरात मराठी व कोंकणी मिळून सुमारे सहाशे पुस्तकेही प्रकाशित होतात. गोव्याची पुस्तकांची परंपरा फार प्राचीन आहे. त्यातच मोलाची भर घातली ती गोवा पुस्तक महोत्सवाने. अनेक महोत्सव होणाऱ्या गोव्यात आता निव्वळ पुस्तक महोत्सवही होऊ शकतो, हे या महोत्सवाने दाखवून दिले. केवळ एक दोन दिवसच नव्हे, तर तब्बल पाच दिवस चाललेल्या महोत्सवात सुमारे तीन लाख लोकांनी उपस्थिती लावून विक्रम घडविला. दोनशेहून अधिक पुस्तक दालनांतून वाचकांनी स्वत:ला पाहिजे ती पुस्तके खरेदी केली आणि आपल्या वाचनसवयीला चालना दिली. लेखक, प्रकाशक, वाचक यांचा सुंदर मिलाफ या महोत्सवात पाचही दिवस पहायला मिळाला. आपले आवडते लेखक, साहित्यिक वाचकांना भेटल्यामुळे त्यांना झालेला आनंद काही वेगळाच होता, अशी दृष्ये पाहताना पुस्तकांचा करिश्मा काय असतो याचे दर्शन घडले. अनेक मान्यवर लेखक, विचारवंत, कलाकार, संगीतकारांच्या मुलाखतींमधून, त्यांनी दिलेल्या व्याख्यानांतून त्यांचा जीवनप्रवास तर उलगडलाच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रेरणाही श्रोत्यांना, वाचकांना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेची मांडणी उदय माहूरकर यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडून आधुनिक राष्ट्रीयत्वाचा उद्घोष केला. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी मुलांना, युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली आणि ती स्वप्ने सत्यात उतरवण्याची गुरुकिल्लीही सांगितली. लहान मुलांना नाटकाचे, कावी कलेचे, चित्रकलेचे व अन्य प्रकारचे प्रशिक्षणही मिळाले. विविध राज्यांतील लोककला प्रकारांचा आविष्कारही पहायला मिळाला. डॉ. किरण ठाकुर यांनी स्वत: गोव्यातील कोकणी, मराठी तसेच हिंदी अनुवादकांचा यथोचित सन्मान केला. गोमंतकीय अन्नपदार्थांचा आस्वादही सर्वांना घ्यायला मिळाला. अत्यंत दर्जेदार ठरलेल्या या महोत्सवाने गोव्याच्या साहित्य चळवळीला, वाचन परंपरेला नवा आयाम प्राप्त करुन दिला आहे.
जीवन जगण्यासाठी जसा ऑक्सिजन हवा, पैसा हवा, तेवढेच महत्त्व पुस्तकांनाही आहे. ‘वाचाल तर वाचाल’ उगाच म्हटलेले नाही. जीवन सुखी, समाधानी, यशस्वी होण्यासाठी जी पंचसूत्री आहे, ती या पुस्तक वाचनातूनच साकार होते. वाचन, पर्यटन, कला, संस्कार व प्रयत्न ही पाच सूत्रे आपल्याला समृद्ध बनवतात आणि ती सूत्रे पुस्तकांशी निगडीत आहेत. वाचनातून आपल्याला आपण न पाहिलेली, न ऐकलेलीही माहिती मिळते. पुस्तकातून ज्ञान मिळते, विचार मिळतात, तर्कबुद्धी वाढते, प्रगल्भता येते. पर्यटनातून अनुभव समृद्ध बनतात. प्रत्यक्ष पर्यटन शक्य नसल्यास प्रवासवर्णन पुस्तक वाचनातून आपण ज्ञानप्राप्ती करुन घेऊ शकतो. माणसाच्या अंगी कोणती ना कोणती कला असायलाच हवी. कलेचे सुप्तगुण प्रत्यकामध्ये असतातच. त्यांना चालना देण्याचे काम वाचनातून होते, प्रशिक्षणातून होते. आपल्या कलेशी निगडीत पुस्तकांचे वाचन करुन आपण कलेत प्राविण्य मिळवू शकतो. शिवाय रिकामा वेळ आपण कलेत घालविल्यामुळे आळशीपणा, वाईट सवयींकडे पोहोचू शकत नाही, एवढी ताकद पुस्तक वाचनात आहे. जेवढे संस्कार आपल्याला आईवडील, घरांतून, शाळेतून मिळत असतात तेवढेच संस्कार पुस्तक वाचनांतूनही आपल्यावर शेवटपर्यंत होत असतात. आत्मचरित्रे वाचल्याने यशस्वी माणसांनी अडचणींवर कशी मात केली? अवहेलना, तिरस्कार, अपमान, आडकाठी अशा प्रतिकूल परिस्थितींचा कसा सामना केला? कितीही संकटे आली तरी आपला प्रवास ‘चरैवेति चरैवेति’ या जिद्दीने चालू ठेवला? आणि अन्य अनेक गोष्टी आपल्याला कळून येतात. त्यातूनच सहजपणे आपल्याला प्रेरणा मिळून जाते. प्रयत्न तर यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. अनेकजण खूप प्रयत्न करत असतात, पण त्यांना यश मिळतच नाही. सगळेच उपदेश करतात की प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल. पण ते खरे नाही. प्रयत्न करत रहायलाच हवे, पण ते योग्य दिशेने असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याबाबतीत पुस्तकेही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अशाप्रकारे पुस्तक वाचनांतून घडणारी ही पंचसूत्री माणसाचे जगणे सुसह्dया करु शकते.
गोवा पुस्तक महोत्सव म्हणजे पणजीत मांडवीच्या तिरावर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, गोव्याचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर पसरलेला जणू पुस्तकांचा महासागरच ठरला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा पुस्तक महोत्सव गोव्यात घडवून आणल्याबद्दल एनबीटी, लोकमान्य कल्चरल फऊंडेशन तसेच डॉ. किरण ठाकुर यांना धन्यवाद दिले, त्यांचे अभिनंदनही केले. एवढेच नव्हे, तर एक पाऊल पुढे जात त्यांनी एनबीटीचा हा पुस्तक महोत्सव गोव्यातच कायम व्हावा, अशी मागणी केली. आयोजनासाठी जे सहकार्य आवश्यक असेल ते गोवा सरकारकडून मिळत राहील, शिवाय आणखी काही नव्या साधनसुविधा आवश्यक असल्यास त्याही निर्माण करुन दिल्या जातील, असेही स्पष्ट केले.
एनबीटीचा हा पुस्तक महोत्सव राष्ट्रीय असल्याने तो विविध राज्यांमध्ये होत असतो, तो कायम गोव्याला द्यावा की नाही, याचा निर्णय एनबीटी घेईल. मात्र गोव्यात असे पुस्तक महोत्सवही यशस्वी होऊ शकतात, हे डॉ. किरण ठाकुर यांच्या टीमने सिद्ध करुन दाखविलेले आहे. मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, रिल्स अशा डिजिटल जमान्यात पुस्तक वाचन होत नाही, असा जो डांगोरा पिटला जातो, त्याला गोवा पुस्तक महोत्सवाने छेद दिला आहे. जे स्वत: वाचन करत नसतात, तेच आता वाचन संपलेय हा जावईशोध लावतात. महोत्सवात येणाऱ्या युवक, विद्यार्थ्यांकडे पाहताना वाचनाची भूक काय असते याचा प्रत्यय येत होता. वाचनसंस्कृतील उज्ज्वल भवितव्य आहे, हे गोवा पुस्तक महोत्सवाने अधोरेखित केले.
राजू भिकारो नाईक