गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये; पुढील तीन महिन्यांचे नियोजन निश्चित
पणजी : आगामी विधानसभा निवडणूक 2027च्या पार्श्वभूमीवर गोवा भाजपने संघटनात्मक हालचालींना वेग दिला असून, पुढील तीन महिने निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संघटनमंत्री शिवप्रकाश आणि गोवा प्रभारी डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या गाभा समितीची बैठक कदंब पठारावरील पक्षाच्या नवीन मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी तीन महिन्यांचे नियोजन निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची कामगिरी आणि गोव्यात झालेला विकास पाहता राज्यात भाजपशिवाय पर्याय नसल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
सेवा संकल्प अभियानाचा आढावा
डॉ. भारती पवार आणि शिवप्रकाश यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व नेत्यांसोबत बैठक घेऊन ‘सेवा संकल्प अभियानाचा’ आढावा घेण्यात आला.
विधानसभा निवडणूक २०२७च्या तयारीबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवरही विचारमंथन करण्यात आले. बूथ पातळीपासून जनतेशी संपर्क वाढवणे, मतदारांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे यावर विशेष भर देण्यात आला.
उमेदवार निवड, युती आणि पक्षप्रवेशावर चर्चा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड, संभाव्य युती, पक्षातील संघटनात्मक बदल आणि नवीन नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विविध मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला.
दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेसकडून सुरू असलेल्या ‘गोंय राखण यात्रे’चाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्याकडे कसे पाहावे आणि पक्षाची भूमिका कशी प्रभावीपणे मांडावी, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
गोव्यातील राजकीय परिस्थितीची माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी डॉ. भारती पवार आणि शिवप्रकाश यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासोबतच जनतेपर्यंत सरकारच्या विकासकामांची माहिती पोहोचवण्यावर भर देण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.
बैठकीला गोवा भाजपच्या राज्य कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपच्या नवीन मुख्यालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. भारती पवार आणि शिवप्रकाश यांनी नव्या कार्यालयाबद्दल समाधान व्यक्त केले.
आगामी तीन महिने निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या कालावधीत जनसंपर्क, संघटन विस्तार आणि राजकीय रणनीतीवर भाजपचा विशेष भर राहणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
