गोवा भाजपकडून नबीन यांचे अभिनंदन
पणजी : भाजपचे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिल्लीत भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या कारकिर्दीत भाजपची संघटना अधिक बळकट होईल आणि ताकद वाढेल, अशा सदिच्छा डॉ. सावंत व नाईक यांनी दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, अशी खात्री व्यक्त केली. दिल्लीत गोव्यातील भाजप शिष्टमंडळाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि दाबोळी विमानतळावरुन नागरी विमान वाहतूक चालूच ठेवावी, अशी मागणी केली.
तो विमानतळ पूर्णपणे नौदलाच्या ताब्यात देऊ नये असेही सूचवले. राजनाथ सिंग यांनी तसे आश्वासन दिल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. गोव्यातील पर्यटन अबाधित राहाण्यासाठी दाबोळी विमानतळ महत्त्वाचा आहे. तो सर्व जनतेसाठी चालू राहणे महत्त्वाचे आहे, असेही राजनाथ सिंग यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दाबोळी विमानतळ नौदलाच्या ताब्यात देण्याचा व नागरी वाहतुकीसाठी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले, असे डॉ. सावंत म्हणाले. शिष्टमंडळात पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार नीलेश काब्राल यांचा समावेश होता.