पर्यटकांना आता ‘गोवा बियॉड’ बीचेस पॅकेज
गोमंतकीयांसाठी तीर्थयात्रांचे आयोजन : सवलतीत मिळणार पर्यटनाचा आनंद
पणजी : गोव्यातील पारंपरिक आणि प्रसिद्ध अशा पर्यटनस्थळांच्या भेटींसह अंतर्गत पर्यटनालाही चालना देणे, तसेच गोमंतकीयांसाठी अन्य राज्यांमध्ये तीर्थस्थळांची यात्रा आयोजित करण्याच्या दृष्टीने गोवा पर्यटन विकास महामंडळाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याशिवाय ‘गोवा बियॉन्ड बीचेस’, ‘या, या मया या’ यांसारख्या विविध पॅकेज पर्यटन टूर सुरू करण्याचाही विचार महामंडळाने चालविला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक यांनी दिली. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी कुलदीप आरोलकर, दीपक नार्वेकर, हे महामंडळाचे अधिकारी तसेच थॉमस कुकचे प्रतिनिधी रूपेश पर्वतकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नाईक यांनी गोव्यातील अंतर्गत पर्यटनाला चालना देणे हा महामंडळाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. म्हणूनच कोविड काळात बंद झालेले अनेक टूर आणि हॉलिडे पॅकेजेस आता सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यातून ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे, असे सांगितले. हल्लीच्या काळात देशभरातील तीर्थस्थळांना भेटी देण्याकडे गोमंतकीयांचा कल वाढत आहे. अशा भाविकांना अष्टविनायक, तिऊपती, शिर्डी, वालंकिणी यांसारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळांची भेट घडविण्याच्या उद्देशाने महामंडळाने यात्रा आयोजित करण्याचा प्रस्ताव आखला आहे. या यात्रा सवलतीच्या दरात आयोजित करण्यात आहेत.
हॉलिडे पॅकेजीसचा पर्याय
हॉलिडे पॅकेजेसबाबत माहिती देताना सांगितले की पर्यटकांना स्थानिक मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने कॅपिटल रिट्रीट, कूल कोस्टलाईन, सदर्न गेटवे यांसारख्या पॅकेजेसचा समावेश आहे. कॅपिटल रिट्रीट पॅकेज पणजी रेसीडेन्सीवरून सुरू होईल, त्यात तीन रात्री चार दिवसांमध्ये सिकेरी, फोर्ट आग्वाद, कळंगुट बीच, वागातोर या स्थळांची सफर घडविण्यात येणार आहे. कळंगुट रेसीडेन्सीवरून कूल कोस्टलाईन पॅकेज सुरू होईल. त्यात न्याहारी, जेवणाची सोय, बॅसिलिका, मंगेशी, शांतादुर्गा मंदिराचे दर्शन आणि रिवर क्रूझ यांचा समावेश असेल. मये रेसीडेन्सीवरून ‘या, या मया या’ हे पॅकेज उपलब्ध होणार आहे. यामध्ये हरवळे धबधबा, विठ्ठल मंदिर, कुडणे येथील जैन मंदिर आणि पांडव गुहा या परिसरांचा समावेश असेल.सदर्न गेटवे पॅकेज मडगाव तसेच वास्को रेसीडेन्सीवरून सुरू केले जाईल. यामध्ये जुने गोवेतील चर्च मंगेशी मंदिर, शांतादुर्गा मंदिर, दोनापावला, नदी सफारी यांचा समेवश असेल, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.