For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जामिनासाठी सत्र न्यायालयात जा!

06:33 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जामिनासाठी सत्र न्यायालयात जा
Advertisement

के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका : कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि आमदार के. कविता यांच्या अटकेच्या विरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. कविता यांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

कविता यांना जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात येण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. त्या एक राजकारणी आहेत, म्हणून प्रक्रियेला वळसा घालून त्या थेट सर्वोच्च न्यायालयात येऊ शकत नसल्याचे न्यायाधीश संजीव खन्ना, एम.एम. सुंदरेश आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावले आहे.

कविता यांना दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीने 15 मार्च रोजी हैदराबाद येथून 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. कविता सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. याचबरोबर कविता यांनी पीएमएलएच्या एका तरतुदीच्या विरोधात याचिका दाखर केली होती. याप्रकरणी न्यायालयाने ईडीकडून 6 आठवड्यांमध्ये स्पष्टीकरण मागविले आहे.

कविता यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आम्हाला उच्च न्यायालयात जाण्यास सांगू नका. देशात काय घडतेय हे पहा. लोक एका वक्तव्याच्या आधारावर अटकेत जात आहेत असा दावा सिब्बल यांनी केला होता. यावर खंडपीठाने एक वकील म्हणून तुम्ही दु:खी होऊ नये तसेच भुवक होऊ नये असे सिब्बल यांना उद्देशून म्हटले. जामिनासंबंधी आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्हाला प्रथम सत्र न्यायालयासमोर जावे लागेल असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुग्रामचे व्यावसायिक अमित अरोरा यांना 30 नोव्हेंबर 2022 मध्ये अटक केली होती. अमितने टीआरएस नेत्या के. कविता यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले होते. कविता या ‘साउथ ग्रूप’ नावाच्या एका मद्य लॉबीच्या नेत्या होत्या. विजय नायरच्या माध्यमातून कविता यांनी दिल्लीतील आप सरकारच्या नेत्यांना 100 कोटी रुपये दिले होते असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

Advertisement
Tags :

.