जाता पंढरीसी सुख वाटे जीवा!
तालुक्याच्या विविध गावातील वारकरी पंढरपूरकडे मोठ्या संख्येने रवाना : विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ
वार्ताहर / किणये
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा! आनंदे केशवा भेटताची!! या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी ! पाहिली शोधूनी अवघी तीर्थे !!
संत सेना महाराजांच्या या अभंगाप्रमाणे पंढरपूरला गेल्यावर जीवाला वेगळेच सुख लाभते. पंढरीच्या विठ्ठलाला, केशवाला भेटली की, अतिशय आनंद होतो या सुखाला त्रिभुवनात उपमान आहे. सर्व तीर्थी शोधली पण पंढरपूरचे महात्म्य सवोपरी आहे. विठूनामाचा गजर आणि दिंड्या पताका यांनी ही नगरी गजबजून जाते. अशा या पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त तालुक्याच्या विविध गावातील वारकरी व भाविक पंढरपूरकडे याअगोदर रवाना झाले आहेत आणि आताही जात आहेत.
तालुक्याच्या विविध गावातील पायी दिंड्या गेल्या बारा ते पंधरा दिवसांपूर्वीच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. त्यातील काही काही दिंड्या रविवारी तर काही गावातील दिंड्या सोमवारी पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेल्या आहेत.
बुधवार दि. 17 रोजी पंढरपुरात आषाढी वारीची यात्रा आहे. यामुळे तालुक्याच्या विविध गावातील वारकरी व भाविक रेल्वे तसेच खासगी टेम्पो व इतर वाहनातून पंढरपूरला जात आहेत. सोमवारी बहुतांशी गावातील वारकरी पंढरपूरला जाताना चित्र पहावयास मिळाले.
अनंत तीर्थाचे माहेर पंढरपूर
पंढरपूर हे अनंत तीर्थाचे माहेर आहे. वारकरी अगदी भक्तीभावाने टाळ मृदंगाचा गजर करीत पंढरपूरला जात आहेत. चंद्रभागेच्या नदीत स्नान करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ साऱ्यानाच लागली आहे.
पायी दिंड्या पंढरपुरात दाखल
वाघवडे, सावगाव व पश्चिम भागातील किणये, मंडोळी, हंगरगा, कर्ले, सोनोली, आंबेवाडी, सुळगा, हिंडलगा, अष्टे, कणबर्गी, बसवाण कुडची तसेच तालुक्यातील अन्य गावातील पायी दिंड्या गेल्या बारा ते पंधरा दिवसांपूर्वी आपापल्या गावातून निघाल्या होत्या. या सर्व दिंड्या सोमवारी सायंकाळीपर्यंत पंढरपुरामध्ये दाखल झाल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुधवारी आषाढी एकादशी असल्यामुळे सोमवारी पहाटेपासूनच तालुक्याच्या विविध गावातील भाविक पंढरपूरला खासगी व रेल्वेमधून जात आहेत. खासगी वाहनातून जात असताना टाळ मृदंगाचा गजर करीत विविध अभंग म्हणत वारकरी जाऊ लागले आहेत.
वारकऱ्यांची संख्येत वाढ
अलीकडील पाच-सहा वर्षात तालुक्याच्या बऱ्याच गावांमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. आषाढी, कार्तिक व माघ एकादशीला वारकरी पंढरपूरला जातात. मात्र, सर्वाधिक आषाढी एकादशीला जातात.