गोमेकॉत रुग्णांच्या आहार व्यवस्थेत सुधारणा; विशेष पोषण आहार उपलब्ध; आरोग्यमंत्री विश्वजित राणे
पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ) उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. रुग्णांना योग्य आणि पौष्टिक आहार मिळणे हा उपचार प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
विशेष वैद्यकीय गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘असिस्टेड न्यूट्रिशन’ अंतर्गत हाय-प्रोटिनयुक्त विशेष आहार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रुग्णांच्या आरोग्यस्थितीनुसार आवश्यक पोषण मिळावे आणि उपचारादरम्यान त्यांच्या शरीराला आवश्यक ऊर्जा व प्रथिने मिळावीत, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णांचे आरोग्य आणि पोषण यांना प्राधान्य देत गोमेकॉतील आहार व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात येत असून, रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अशा उपाययोजना सातत्याने राबविल्या जात असल्याचे राणे यांनी नमूद केले.