For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्ण-सुदामा अन् पोह्यांचा महिमा!

12:26 PM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्ण सुदामा अन् पोह्यांचा महिमा
Advertisement

मॅगीचे महत्त्व पटवून देण्याच्या चढाओढीत पोह्यांना आले विशेष महत्त्व : करायला सोपे, खायला चविष्ट सर्वांना परवडण्याजोगे

Advertisement

बेळगाव : आज जागतिक पोहे दिन. मॅगीचे महत्त्व पटवून देण्याच्या चढाओढीत पोह्यांना विशेष महत्त्व आले आणि 7 जून हा जागतिक पोहे दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या पोह्यांचा हा चविष्ट व खमंग प्रवास...

पाहुणे आलेत? पटकन पोहे करा. स्थळ पहायला जायचे आहे? कांदापोहे करा. बाप्पाची पाठवणी दहीपोह्याने करा. भूक लागली म्हणून हट्ट करणाऱ्या मुलांना दहीदूध पोहे द्या किंवा तूपगूळ पोहे द्या... पोहेच पोहे... आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने पोहे हा पदार्थ महत्त्वाचे स्थान पटकावून बसला आहे. करायला सोपे, खायला चविष्ट आणि पुन्हा परवडण्याजोगे. त्यामुळे हॉटेल कोणतेही असो, तेथे पोहे हा पदार्थ मेनुकार्डवर अग्रभागी असतो. या पोह्यांनी इतकी लोकप्रियता मिळविली आहे, की आता फक्त पोहे देणारी हॉटेल्स अस्तित्वात येऊ लागली आहेत. खरोखरच पोहे हा पदार्थच तसा आहे. याचा इतिहास किंवा उगम याबद्दल कोणीच खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही. परंतु, महाभारतामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या गोष्टीतील पोह्यांचा उल्लेख पाहता ते महाभारत काळाआधीसुद्धा असावेत, असा अंदाज बांधता येतो. काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो, की ब्रिटिश सैन्य जेव्हा भारतात आले तेव्हा या वातावरणाला टिकून राहण्यासाठी त्यांनी पोहे आपलेसे केले. सायप्रसमध्ये पोहेच पाहिजेत, यासाठी सैनिकांनी आंदोलनही केले, अशी वंदता आहे.

Advertisement

ते काही असो, पोहे लोकप्रिय आहेत एवढे नक्की. या पोह्यांचे प्रकार तरी किती? पोहे म्हटले की कांदापोहे व दडपेपोहे हे दोन प्रकार ठळकपणे समोर येतात. पण यातही अनेक विविध प्रकार आहेत. गोड, तिखट, चमचमीत, खमंग अशा विविध चवींनी पोहे तयार करता येतात. हा पदार्थ सहसा चुकत नाही म्हणूनही गृहिणी त्याच्या प्रेमात असाव्यात. हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहे आवडण्याचे कारणही हेच आहे. पोह्याचा जन्म कसा झाला, हे सांगता येत नाही. परंतु, कदाचित जेव्हा शेतातील भात साठवून ठेवले जात होते, तेव्हा कधी तरी पावसामुळे ते ओले झाले असेल. ते सुकवण्यासाठी म्हणून त्याला विस्तवाची धग दिल्यावर पोह्यांचा जन्म झाला असेल. ते काही असो, या पदार्थाने आपल्या मनामनात स्थान मिळवले आहे, हे नक्की. कांदापोहे तर लोकप्रिय आहेतच. कधी त्याच्यात बटाटा, कधी कोबी, कधी या दोन्हींसह ढबू मिरची घालून पोहे केले जातात. यावरच शेव घातली तर त्याची चव आणखीनच बहरते. दडपे पोहे म्हणजे फोडणी घालून भरपूर खोबरे, टोमॅटो किंवा वाळूक घालून लिंब पिळून केलेले पोहे. परंतु, पोह्यांवर नारळाचे पाणी शिंपडून त्यावर थोडी साखर, मीठ, खोबरे आणि तिखट घातले की तेसुद्धा दडपे पोहेच.

बेळगावचा सुप्रसिद्ध आलेपाक

याच पोह्यांपासून बेळगावचा सुप्रसिद्ध आलेपाक तयार होतो. नुसत्या पोह्यांना वरून कच्चे तेल आणि मीठ-तिखट घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातली तर या पोह्यांची चव वेगळीच लागते. मुळात करायला सोपे आणि वेळ वाचणारे म्हणून हे पोहे आजही केले जातात. लहान मूल भूक म्हणून भुणभुण करू लागले की, त्याला दूधगुळ पोहे, दहीसाखर पोहे तर आपण देतोच. पण खास दहीपोहे करण्याचासुद्धा एक बेत असू शकतो. पोहे भिजवून थोडेसे मोकळे झाले की, त्यात थोडे दूध, घट्ट दही घालून ते कालवायचे आणि त्यावर मेथ्याच्या मिरच्यांची फोडणी देऊन कोथिंबीर पेरली की एक झकास पदार्थ आपल्यासमोर येतो. कोळाचे पोहे म्हणजे चिंचगूळ एकत्र करून त्यामध्ये पोहे मिसळून वर शिजलेल्या बटाट्याच्या फोडी, खोबरे, कोथिंबीर घातली की आंबटगोड चवीचा हा पदार्थ पुन्हा पुन्हा चाखावासा वाटतो.

गुळाचा पाक करून त्यात पोहे कालवले की, वेगळ्या चवीचे गोडपोहे तयार होतात. शिवाय पातळ पोहे तूप आणि गुळामध्ये कालवून त्यावर खोबरे पेरून दिले की, गोडखाऊ मंडळी खुश होणारच. पोहे भरपूर पिठी साखर आणि खोबरे एकत्र करून शेंगदाण्याचे कूट घालून केला जाणारा पोह्यांचा प्रकार एका बैठकीतच गट्टम केला जातो. गौरीच्या जेवणावेळी केल्या जाणाऱ्या चित्रान्नाप्रमाणे पोह्याचासुद्धा चित्रान्ना केला जातो. ताजा भात करून त्यावर भरपूर कढीलिंब, हरभरा व उडीद डाळ, लाल मिरच्या, शेंगदाणे यांची फोडणी देऊन वर आंब्याचा किस किंवा लिंबू पिळून चित्रान्ना तयार होतो. भाताऐवजी पोहे वापरले की पोह्याचा चित्रान्ना तयार झाला. याचप्रमाणे खास कर्नाटकी असलेल्या बिशीब्याळी भाताप्रमाणे बिशीब्याळी पोहेसुद्धा केले जातात.

पोह्यांचे लोकप्रिय पापड

पोह्याचे पापड तर लोकप्रिय आहेतच. परंतु, पोहे, तिळ आणि ओली मिरची, मीठ वापरून केलेले सांडगे तुळशीच्या लग्नावेळी खाल्ले जातात. पोह्याचे थालीपीठ आणि अलीकडे वेगवेगळ्या रेसिपीमध्ये इडली-दोशांमध्ये पोह्यांचा वापर सर्रास होतो आहे. बाप्पाची पाठवणी करताना हमखास दहीपोहे केले जातात. तर पोहे तळून त्यात साखर, खोबरे, चवीला वेलदोड्याची पूड घातली आणि परिस्थितीनुरूप सुकामेवा घातला तर पंचखाद्य तयार होऊन त्याचा प्रसाद होतो. पोह्यांची ही मालिका आता वाढत चालली आहे. आता सांबार पोहे, तर्री पोहे, मटकी पोहे, इंदोरी पोहे अशी पोह्यांची मालिकाच पहायला मिळते. हा एकमेव पदार्थ असा आहे, की तो प्रत्येकाला त्याच्या आवडीची चव देऊ शकतो. उगाच नाही श्रीकृष्णानेसुद्धा सुदाम्याचे पोहेसुद्धा अजरामर केले.

सुदाम्याचे आदरपूर्वक स्वागत

धनाढ्या अशा श्रीकृष्णाला भेटायला जाताना सुदाम्याला काय न्यावे? हा प्रश्न पडला. त्याने पत्नीकडे विचारणा केली. तिने शेजारी जाऊन पोहे पाखडणाऱ्या शेजारणीकडून पोहे पाखडून समोर येणारा चुरा आणला व तो चुरा सुदाम्याने आपल्या उपरण्यात बांधून तो श्रीकृष्णाकडे गेला. त्याचे दीनवाणे रूप पाहून वाड्यात त्याला प्रवेश मिळत नव्हता. परंतु, श्रीकृष्णाने त्याला आदरपूर्वक बोलावले आणि माझ्यासाठी काय आणलेस? असे विचारले.

अन् श्रीकृष्णाने हट्टाने पोह्याचा तो चुरा मिटक्या मारीत खाल्ला

बापुडवाण्या सुदामाने आपल्या उपरण्याची गाठ लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्रीकृष्णाने हट्टाने पोह्याचा तो चुरा मिटक्या मारीत खाल्ला. इतकेच नव्हे तर राजवाड्यातील सर्वांनीच त्याचा आस्वाद घेतला तरी तो चुरा संपला नाही. मैत्री आणि स्नेह यामध्ये श्रीमंती नव्हे तर भाव महत्त्वाचा हे लक्षात आणून देऊन श्रीकृष्णाने पुढे सुदामाला राज्य दिले, अशी ही पोह्यांची कथा. तेव्हापासून कोणी पोहे समोर केले की, सहसा नकार दिला जात नाही.

Advertisement
Tags :

.