वैभवी यश आणि प्रवास
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताच्या अंडर-19 संघाने सहावा विश्वचषक जिंकत जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने झिम्बाब्वेमध्ये इतिहास घडवला, तोही केवळ विजय मिळवून नव्हे, तर दबदबा निर्माण करून. 1983 साली झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देव यांनी खेळलेली 175 धावांची ऐतिहासिक खेळी ही केवळ एक इनिंग नव्हती, तर भारतीय क्रिकेटच्या आत्मविश्वासाचा जन्मबिंदू होती. त्या एका खेळीने भारताच्या क्रिकेट प्रवासाची दिशा बदलली. तब्बल चार दशकांनंतर, त्याच झिम्बाब्वेच्या भूमीवर, हरारेतच, वैभव सूर्यवंशीने खेळलेली 175 धावांची खेळी ही केवळ योगायोग मानता येणार नाही. ती भारतीय क्रिकेटच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जिद्दीची, तयारीची आणि मानसिक बळाची साक्ष आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसारख्या बलाढ्या संघाचा तब्बल 100 धावांनी पराभव केला. 412 धावांचे आव्हान उभे करणे आणि त्यानंतर इंग्लंडला 311 धावांवर रोखणे, ही केवळ सांघिक कामगिरी नव्हती, तर भारतीय क्रिकेटच्या अंडर-19 व्यवस्थेची यशोगाथा होती. इंग्लंडने डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. सलामीवीर बेन डॉकिन्सने 56 चेंडूंमध्ये 66 धावांची खेळी करत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केलेब फाल्कनरने शतक झळकावत प्रतिकार केला, मात्र क्रिकेट हा संघाचा खेळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध, भेदक आणि संयमी माऱ्यापुढे अक्षरश: नांगी टाकताना दिसले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संयम, डावपेच आणि भागीदारीची गरज असते, जी इंग्लंडकडे अभावाने दिसली. मात्र या सामन्याचा खरा केंद्रबिंदू ठरला तो वैभव सूर्यवंशी. पहिल्या डावात सलामीला उतरलेल्या वैभवने अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची खेळी करत भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. ही खेळी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नव्हती, तर ती आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक परिपक्वतेचे दर्शन घडवणारी होती. अंडर-19 वर्ल्डकपच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणारा वैभव हा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच, प्लेऑफ सामन्यात 350 हून अधिक धावा करणारा भारत हा पहिला संघ ठरला. विशेष म्हणजे, याआधीही हा विक्रम भारताच्याच नावावर होता. 2016 मध्ये नामिबियाविरुद्ध भारताने 249 धावा केल्या होत्या, हेही याच परंपरेचे उदाहरण आहे. 1988 ते 2024 या कालावधीत एकूण 15 अंडर-19 विश्वचषक स्पर्धा झाल्या असून, त्यामध्ये भारताने सर्वाधिक पाच वेळा हा चषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा ही स्पर्धा जिंकली असली, तरी सातत्य, गुणवत्ता आणि खेळाडू घडवण्याच्या प्रक्रियेत भारत आघाडीवर आहे. अंडर-19 विश्वचषक हा केवळ ट्रॉफी जिंकण्याचा मंच नसून, तो भारतीय क्रिकेटसाठी प्रतिभा शोधण्याची प्रयोगशाळा ठरली आहे. 2000 साली युवराज सिंगने अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आपली छाप पाडली. पुढे 2007 च्या टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये युवराजने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 वर्ल्डकप जिंकला आणि पुढील दशकात विराट भारतीय क्रिकेटचा कणा ठरला. 2012 मध्ये उन्मुक्त चंद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये यश धूल यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा पुन्हा हे सिद्ध केले की अंडर-19 स्तरावरील यश हा अपघात नसून नियोजनाचा परिणाम आहे. रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शिखर धवन, के. एल. राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, ईशान किशन यांसारखे खेळाडू अंडर-19 क्रिकेटमधूनच घडले आणि पुढे त्यांनी भारतीय प्रौढ संघात मोठे योगदान दिले. त्यामुळे वैभव सूर्यवंशीची खेळी ही केवळ आजचा आनंद नसून उद्याच्या आश्वासक भविष्याची नांदी आहे. हरारेतील हा विजय सांगतो की भारतीय क्रिकेटची मुळे खोलवर रुजलेली आहेत. कपिल देवपासून वैभव सूर्यवंशीपर्यंतचा हा प्रवास हा केवळ काळाचा नाही, तर मूल्यांचा, मेहनतीचा आणि विश्वासाचा आहे. भारतीय क्रिकेटचा हा प्रवास अजूनही थांबलेला नाही; तो अधिक भक्कम, अधिक व्यापक आणि अधिक प्रेरणादायी होत चालला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदानंतर लक्ष पुढील महत्त्वाकांक्षी टप्प्यावर आहे आगामी 2026 आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कप, जो भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदावर 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत 2024 च्या टी-20 विश्वचषकाचा विजेता आहे, जो त्यांनी बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून पटकवला होता. या पार्श्वभूमीवर यजमान म्हणून भारताचा मजबूत दावादेखील उभा आहे आणि संघ पुन्हा एकदा खिताब रक्षण करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तथापि, टी-20 क्रिकेटचे स्वरूप विशेषत: अनिश्चित आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये क्षणिक धडाकेबाज खेळी आणि अप्रत्याशित वळणं हे सर्व काही शक्य करतात, त्यामुळे कोणतीही भविष्यवाणी निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक आणि मनोरंजक टी-20 विश्वचषक पहायला मिळेल याची अपेक्षा आहे. याशिवाय, घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव, स्थानिक परिस्थितीची अचूक जाण आणि प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा हे घटक भारताच्या बाजूने जातील. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, आयपीएलमधून मिळालेला टी-20 अनुभव आणि अंडर-19 स्तरावरून येणारी नवी पिढी यामुळे भारतीय क्रिकेटचा पाया अधिक भक्कम होत चालला आहे. त्यामुळे हा टी-20 वर्ल्डकप भारतासाठी केवळ स्पर्धा नसून वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी ठरणार आहे.