जागतिक संकेतांमुळे बाजारात चमक
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन दिवसात 7 लाख कोटींची वाढ : सेन्सेक्स 225 तर निफ्टी 37 अंकांनी वधारला :
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी पुन्हा एकदा जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजाराला बळ मिळाले आहे. या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्यात चमक राहिली. जवळपास दोन दिवसांच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
बुधवारी बीएसई सेन्सेक्स सकाळाच्या वेळी 400 अंकांनी वाढून 76,900 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो 76,479 अंकांवरपर्यंत घसरला होता. परंतु शेवटच्या काही तासांत सेन्सेक्स पुन्हा उसळी घेत 224.45 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 76,724.08 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी50 देखील मजबूतीने उघडला. मात्र अंतिमक्षणी तो 37.15 वर तेजी प्राप्त करुन 23,213.20 वर बंद झाला,
देशांतर्गत शेअर बाजार सलग व्यापारी सत्रात वधारला. अदानी ग्रीन, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि एनटीपीसी सारख्या ऊर्जा समभाग आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. तथापि, देशांतर्गत कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री बाजाराला बळ देऊन गेली आहे.
सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 30 कंपन्यांपैकी झोमॅटोचे समभाग 4 टक्केपेक्षा जास्त वाढीसह बंद झाला. एनटीपीसी, पॉवर ग्रिड, कोटक बँक, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मजबूत राहिले आहेत.
दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक बंद झाले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि एशियन पेंट्स हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
यामुळे बाजारात उत्साह
- बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 0.3 टक्क्यांनी वाढून 86.36 प्रति डॉलरवर बंद झाला. तसेच रुपया 27 पैशांनी वधारला. गेल्या सात महिन्यांतील रुपयातील ही सर्वात मोठी एका दिवसाची वाढ आहे.
- अदानी एनर्जी, एनटीपीसी आणि जेएसडब्ल्यू एनर्जी सारख्या ऊर्जा समभागांनी वाढ नोंदवली. यामुळे बाजाराला तेजीसाठी मदत झाली.
- याशिवाय, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक सारख्या आयटी समभागांमध्ये खरेदी केल्यानेही बाजाराला बळ मिळाले
- त्याच वेळी, जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार मजबूत झाले.
गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 7 लाख कोटींची वाढ
शेअर बाजारातील गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमधील रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सोमवारी (13 जानेवारी) बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 4,17,15,124 कोटी रुपये होते. बुधवारी ते 7 लाख कोटी रुपयांवरून 4,24,31,020 कोटी रुपयांवर पोहोचले.