जागतिक बाजार दमदार तेजीत
वृत्तसंस्था/टेक्सास
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवर व्यापार शुल्क आकारणीला 90 दिवसांकरिता स्थगिती दिली असून याचा परिणाम गुरुवारी जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक पहायला मिळाला. अमेरिका, जपान, आशियातील बाजारांनी गुरुवारी मोठी उसळी घेतली होती. भारतीय शेअर बाजार गुरुवारी महावीर जयंतीच्या निमित्ताने बंद होता. मात्र जागतिक बाजारांचे कामकाज नेहमी प्रमाणे गुरुवारी सुरू होते. गुरुवारी सकाळी ट्रम्प यांच्या शुल्क स्थगितीसंदर्भातील घोषणेनंतर अमेरिकेसह विविध देशांच्या शेअरबाजारांनी दमदार उसळी घेत आनंद व्यक्त केला. या निर्णयानंतर अमेरिकेतील एस अॅण्ड पी 500 निर्देशांक जवळपास 9.5 टक्के वधारत व्यवहार करत होता. याच दरम्यान नॅसडॅक निर्देशांक तब्बल 1857 अंकांनी वाढत 17124 च्या स्तरावर कार्यरत होता. तिकडे युरोपियन बाजारातही 5.3 टक्के इतकी भरभक्कम तेजी पहायला मिळाली. तज्ञांच्या मते मार्च 2020 नंतरची युरोपातील बाजारातील ही सर्वात मोठी तेजी आहे. या व्यतिरिक्त लंडन, पॅरिस आणि फ्रँकर्ट यांच्या बाजारातही 4 ते 5 टक्क्यांची तेजी दिसून आली.
आशियाई बाजारातही उत्साह
इकडे आशियाई बाजारात जपानचा निक्केई 8 टक्के इतका वाढत व्यवहार करत होता. आशिया पॅसेफिक विभागातील समभाग मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले. हाँगकाँगमधील हँगसेंग निर्देशांक 2 टक्के वधारत व्यवहार करत होता. मागच्या आठवड्यामध्ये युएस बॉन्डस् मोठ्या प्रमाणात विक्री होत होते. जी गुरुवारी काहीअंशी घटलेली पहायला मिळाली. गिफ्ट निप्टी निर्देशांकानेही 683 अंकांची तेजी पाहिली आहे. स्ट्रेट टाईम्स 184 अंकांनी, सेट कंपोझीट 45 अंकांनी, कोस्पी 151 अंकांनी, शांघाई कंपोझीट 36 अंकांनी, जकार्ता कंपोझीट 286 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. जागतिक बाजारात ब्रेंटव्रुड कच्च्या तेलाच्या किंमती थोड्याशा वधारत 63.52 वर पोहोचल्या होत्या.