चर्चेद्वारेच जागतिक मुद्दे निकाली काढावेत
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आसियान सदस्य देशांसमोर संबोधन : लाओसमध्ये दक्षिण चीन समुद्राच्या वादावर मांडली भारताची बाजू
वृत्तसंस्था/लाओस
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लाओसमध्ये आयोजित क्षेत्रीय सुरक्षा बैठकीत भाग घेतला आहे. या बैठकीत त्यांनी सीमा वाद, व्यापार करारांसमवेत अनेक मुद्द्यांवर आसियान देशांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. शांततापूर्ण चर्चेसाठी सीमा वाद सोडविणे ही भारताची प्रतिबद्धता राहिली आहे. भारताने नेहमी जटिल मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा पुरस्कार केला असल्याचे म्हणत राजनाथ सिंह यांनी बौद्ध धर्माचा उल्लेख केला.
सीमा वाद, व्यापार करार यासारख्या जागतिक आव्हानांवरून आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. खुल्या चर्चेमुळे विश्वास वाढतो आणि स्थायी भागीदारीचा पाया रचला जातो असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. जागतिक समस्यांवर दीर्घकालीन तोडगा हा देश एकमेकांच्या विचारांचा सन्मान करत असतील तरच निघू शकतो. जगात ध्रूवीकरण वाढत चालल्याने शांततापूर्ण सह-अस्तित्वाच्या भगवान बुद्धांच्या मूल्यांना अधिक सखोलपणे अवलंबिले जाण्याची वेळ आली असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
भारत हिंद-प्रशांत क्षेत्रात शांततेला बळ देण्यासाठी नौवहन, उ•ाणाचे स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनाच्या बाजूने असल्याचे राजाथ सिंह यांनी दक्षिण चीन समुद्रासाठी प्रस्तावित आचारसंहितेवर बोलताना म्हटले आहे. विविध देशांच्या हितसंबंधांवर प्रतिकूल प्रभाव पडणार नाही अशा आचारसंहितेला लागू करण्याची गरज आहे. कुठलीही आचारसंहिता ही पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुरुप असायला हवी. ही संहिता आंतरराष्ट्रीय कायदा खास करून संयुक्त राष्ट्रसंघ सागरी कायदा 1982 चे पालन करणारी असावी, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बैठकीत भारताचा सहभाग
आसियान (असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स) देशांची ही बैठक चीनसोबत दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात सुरू असलेल्या वादांदरम्यान आयोजित होत आहे. यावरून आसियानमध्ये सामील देश लाओसमध्ये चीनसोबत थेट चर्चा करत आहेत. परंतु या बैठकीत आसियानचे सदस्य नसलेल्या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा समावेश आहे. दक्षिण चीन समुद्रावरून आसियानमध्ये सामील फिलिपाईन्ससमवेत व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई या देशांचा चीनसोबत वाद आहे. याच मुद्द्यांना उपस्थित करण्यासाठी आसियानचे अन्य सदस्य देश इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार, सिंगापूर, लाओस आणि कंबोडिया हे एकत्र आले असून त्यांनीच बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.