For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्य आशियातून जागतिक अस्थैर्य

06:59 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्य आशियातून जागतिक अस्थैर्य
Advertisement

जगाच्या राजकारणात युद्धाची भाषा कधीच नवी नाही. मात्र अलीकडच्या काळात ती अधिक आक्रमक, थेट आणि चिंताजनक होत चालली आहे. इस्रायल-इराण संघर्ष आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील तणाव या दोन स्वतंत्र वाटणाऱ्या घडामोडी प्रत्यक्षात एकाच जागतिक प्रवृत्तीचं प्रतिबिंब आहेत. संयम संपविलेले आणि नसलेली शक्ती फुगवून दाखवून त्याद्वारे प्रश्न सोडवण्याची फुशारकी मारणारे लोक सत्तेवर बसल्याने त्यांच्या कृतीची जगाला चिंता लागली आहे. 28 फेब्रुवारी रोजीची घटना पाहता ही चिंता केवळ सैद्धांतिक राहिलेली नाही. इस्रायलने इराणविरुद्ध ‘प्री-एम्प्टीव्ह अटॅक‘ जाहीर केला आहे, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलसह कंधार, पक्तिया या प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केले आहेत. दोन्ही ठिकाणी ‘ओपन वॉर‘ आणि ‘मेजर कॉम्बॅट ऑपरेशन्स‘ अशा भाषा वापरल्या जात आहेत. ही भाषा केवळ दोन प्रदेशांची नाही, तर संपूर्ण जगाची स्थिरता धोक्यात आणणारी आहे. इस्रायलने इराणविरोधात ‘प्री-एम्प्टीव्ह अटॅक‘ केल्याची घोषणा करून एक गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न उभा केला आहे. ‘आपल्यावर हल्ला होणार आहे’ या शक्यतेवर आधारित आधीच हल्ला करणं, ही संकल्पना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत कायमच वादग्रस्त राहिली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर करणं आणि हवाई हल्ल्याचे सायरन वाजवणं, यावरून या कारवाईचं गांभीर्य लक्षात येतं. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, इराणी माध्यमांनी हल्ल्याची पुष्टी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर व्हिडिओ प्रसिद्ध करून ‘मेजर कॉम्बॅट ऑपरेशन्स’ सुरू झाल्याची घोषणा केली. जून 2025 मधील 12 दिवसांच्या युद्धानंतर आलेली शस्त्रसंधी तात्पुरती ठरली, हे आता स्पष्ट झाले आहे. तेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाच्या तीन प्रमुख केंद्रांवर हल्ले केले होते. आता पुन्हा प्री-एम्प्टीव्ह कारवाई सुरू झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात थेट युद्ध झालेलं नसतानाही छुप्या लढाया, सायबर हल्ले, गुप्त कारवाया सातत्याने सुरू आहेत. इराणच्या प्रॉक्सी गटांद्वारे (हिजबुल्लाह, हमास) इस्रायलला घेरण्याचा प्रयत्न आणि इस्रायलचा त्याविरोधातील प्रतिहल्ला ही सलग चक्रे आता थेट युद्धात रूपांतरित होत आहेत. प्री-एम्प्टीव्ह हल्ल्यांची सगळ्यात मोठी जोखीम म्हणजे गैरसमज. एखादा देश भविष्यातील संभाव्य हल्ल्याच्या अंदाजावर कारवाई करतो, तेव्हा तो अंदाज चुकीचा ठरल्यास त्याचे परिणाम संपूर्ण प्रदेशाला भोगावे लागतात. मध्य पूर्व आधीच अस्थिर असताना, इस्रायल-इराण संघर्ष उघड युद्धात रूपांतरित झाला तर त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्था, तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. तेलाच्या किमती आधीच वाढत आहेत. पर्शियन गल्फमध्ये युद्ध वाढलं तर जगभरात इंधन संकट, महागाई आणि मंदीचे सावट येईल. युरोप, आशिया, आफ्रिका असा सर्वत्र प्रभाव पडेल. शिवाय, इराणचे प्रॉक्सी गट (इराक, सीरिया, येमेन) सक्रिय होतील. एक छोटासा गैरसमज संपूर्ण प्रदेशाला आगीत लोटू शकतो. दुसरीकडे, दक्षिण आणि मध्य आशियातही तणाव वाढत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात ‘दहशतवादी अ•dयांवर’ हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. 22 फेब्रुवारीला सुरू झालेल्या हल्ल्यांनंतर तालिबानने सीमेवर पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला. त्यावर पाकिस्तानने 27-28 फेब्रुवारीला काबूल, कंधार, पक्तिया या शहरांवर व्यापक हवाई हल्ले केले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘आमचा संयम संपला, आता उघड युद्ध’ अशी भाषा वापरली. पाकिस्तानने 37 ठिकाणांवर हल्ले करून शेकडो तालिबानी सैनिक ठार केल्याचा दावा केला, तर तालिबानने पाकिस्तानी चौक्यांवरील हल्ल्यात 55 सैनिक ठार झाल्याचे सांगितले. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने नागरी वस्ती, मदरसा, महिला आणि लहान मुलांवर हल्ले झाल्याचे आरोप केले. युनायटेड नेशन्सनेही पूर्वीच्या हल्ल्यांत नागरी जीवितहानीची पुष्टी केली आहे. या परस्परविरोधी दाव्यांमधून विश्वासाचा पूर्ण अभाव दिसून येतो. दोन्ही देशांच्या सीमा (दुरंद लाइन) 2600 किलोमीटर लांब, डोंगरदऱ्या, वाळवंट यावर नियंत्रण कठीण आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारखे गट अफगाणिस्तानात आश्रय घेतात, असे पाकिस्तानचे आरोप. तालिबान मात्र पाकिस्तानला ‘दहशतवादाला प्रोत्साहन’ देणारा म्हणतो. हा संघर्ष केवळ लष्करी न राहता मानवी संकटात रूपांतरित होतो आहे. लाखो नागरिक विस्थापित होण्याची भीती, शाळा-मदरसे बंद, अर्थव्यवस्था ठप्प. अर्थात दोन्हीकडचे नादान सत्ताधारी मानवता आणि आधुनिक जगाची ‘जगा आणि जगू द्या’ ही भाषा न समजणारे टोळीवाल्यांच्या न्यायचेच समर्थक आहेत. अनेकांनी प्रयत्न करूनही ते तिथला समाज मध्ययुगात कसा राहील याकडे लक्ष देणारे आहेत. अशावेळी या संघर्षात महासत्तांचा सहभाग परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करतो आहे हे विशेष. ट्रम्प यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात हस्तक्षेप करण्याची शक्यता व्यक्त केली, मात्र ‘पाकिस्तानशी चांगली मैत्री आहे’, ‘ग्रेट प्राइम मिनिस्टर, ग्रेट जनरल’ असे म्हणत पाकिस्तानची बाजू घेतली. अमेरिका इस्रायल-इराणमध्ये थेट सहभागी झाली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग़ची यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती, पण ती फारशी प्रभावी ठरली नाही. प्रश्न असा आहे की हे हस्तक्षेप खरोखरच शांततेसाठी आहेत का, की भूराजकीय प्रभाव वाढवण्यासाठी? इतिहास सांगतो की, अशा संघर्षांत बाह्य हस्तक्षेप अनेकदा तात्पुरता तोडगा देतो, पण दीर्घकालीन अस्थैर्य वाढवतो. 1979 च्या सोव्हिएत-अफगाण युद्धापासून ते आजपर्यंत, बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाने प्रदेश अधिक अस्थिर झाला.आज इस्रायल-इराण असो वा पाकिस्तान-अफगाणिस्तान, दोन्ही ठिकाणी एक समान धागा दिसतो तो सुरक्षेच्या नावाखाली आक्रमकतेचा. प्रत्येक देश आपली कारवाई ‘संरक्षणात्मक’ असल्याचं सांगतो, पण त्याचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागतात. स्फोटांचे आवाज, हवाई हल्ल्यांचे सायरन, रात्री हादरलेली घरं, गमावलेले जीव, युद्धाने निर्माण झालेली भीती ही कोणत्याही धोरणाची किंमत असू शकत नाही. मध्य पूर्वेत तेल उत्पादन थांबलं, तर जगभर महागाई. आशियात स्थिरता गेली तर व्यापार मार्ग, ऊर्जा पुरवठा, मानवी स्थलांतर आणि सर्व घटक प्रभावित होतील. आण्विक क्षमता असलेल्या देशांमध्ये एक छोटी चूक जागतिक युद्ध घडवू शकते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.