जागतिक अस्थिरता आणि नोबेल
जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मंदी बेरोजगारी त्याचबरोबर युद्धातून निर्माण झालेली अशांतता उत्पादन, पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे यातून समाजातील दुर्बल घटकांचे संरक्षण करणारे धोरण महत्त्वाचे ठरते. नेमके हीच भूमिका यावर्षीच्या नोबेल पारितोषिक सन्मानित रॉबर्ट हॉल व मायकेल वूडफोर्ड यांनी घेतली आहे. आर्थिक स्थैर्यासाठी शासनाच्या धोरणासोबतच लोकांच्या अपेक्षा आणि भविष्यकालीन अडचणी यांचाही परिणाम देशाच्या अस्थिरतेवर होत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकी कोणत्या प्रकारची धोरण चौकट असावी याबाबत मार्गदर्शक म्हणून नोबेल पारितोषिक सन्मानित अभ्यासकांची सूचना महत्त्वाची ठरते.
अस्थिरता नेहमीच असते
जागतिक स्तरावरील उत्पादन, रोजगार, उत्पन्न हे नेहमीच चढउताराचे किंवा अस्थिर स्वरूपाचे असते. तांत्रिक बदल यामध्ये भर घालत असतात. कारखानदारी पद्धती ही मूलत: यांत्रिकी शोधाचा परिणाम असून उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी त्याचा जसा उपयोग झाला तसेच त्यातून आर्थिक साम्राज्यवाद निर्माण झाला. उत्पादनांची साधने आणि बाजारपेठ आपल्या ताब्यात राहावी यामध्ये जे यशस्वी झाले तेच विकसित झाले. साधन संपत्ती असूनही त्याचा वापर योग्य प्रकारे न करणारे मात्र अविकसित राहिले. उत्पादन आणि उपभोग या क्षेत्रात असणारी वास्तव अर्थव्यवस्था आणि चलनाच्या साह्याने व्यक्त होणारी वित्तीय व्यवस्था या दोन्हीच्या समन्वयातून अर्थव्यवस्था चालत असते. किंमत यंत्रणेवर आधारित भांडवलशाही नेहमीच नफ्याच्या प्रेरणेने कार्य करत असते. ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्यात फायदा वाढल्याने त्याच्या उत्पादनात वाढ होते. परंतु अशा वस्तू खपल्या नाहीत तर त्याची किमती कमी करावी लागते व त्यातून उत्पादकाचे नुकसान होऊन उत्पादन कमी केले जाते. जेव्हा मागणी वाढते तेव्हा कामगारांना रोजगार मिळतो, त्यांचे उत्पन्न वाढते आणि त्या उत्पन्न वाढीतून आणखी मागणी वाढते, यालाच तेजीचे चक्र म्हणता येते. याउलट वस्तूला मागणी कमी झाल्यानंतर त्या क्षेत्रातील कामगारांना बेरोजगारी पत्करावी लागते आणि त्याचबरोबर त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने इतर क्षेत्रातही मागणी कमी होते व मंदीचे चक्र सुरू होते. याबाबत 1929 ची महामंदी आणि त्यातून सावरण्यासाठी सरकारने कसे प्रयत्न करावे याचे मार्गदर्शन जॉन मेनार्ड केन्स यांनी केले होते. मंदी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी सरकारने आपले धोरण अर्थव्यवस्थेला गती देणारे ठेवले पाहिजे. त्यासाठी लोकांच्या हाती उत्पन्न व पैसा देण्यासाठी करांचे प्रमाण कमी करणे आणि सरकारी कामे सुरू करून त्यातून मोठ्या प्रमाणात मागणीला प्रोत्साहित करणे, अशी धोरण चौकट सुचवली. यातूनच मागणी वाढल्याने आपोआप खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढून रोजगार वाढतात आणि मंदी संपुष्टात येते. यालाच सरकारचे राजकोषीय धोरण असे म्हणतात. याचा वापर करून महामंदी दूर करण्यात आली. सध्या जगाची वाटचाल अस्थिर आणि अनिश्चिततेच्या संकटाकडे वाटचाल करत असून त्याचे परिणाम दुर्बल राष्ट्रे आणि दुर्बल कुटुंबे यांना पत्करावे लागतात. मंदीच्या काळात उत्पादन, रोजगार यातील घसरण वाढत गेल्यास राष्ट्रीय उत्पन्न देखील घटते. अनेक लोकांचा कर्जबाजारीपणा वाढतो. उद्योग अडचणीत येतात. याचे व्यवस्थापन करण्यासाठी राजकोषीय आणि चलनविषयक किंवा मौद्रिक धोरण महत्त्वाचे ठरते. अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी ही धोरणात्मक डबल इंजिन चौकट वापरावी लागते.
व्यक्तिगत निर्णयाचे राष्ट्रीय महत्त्व
कुटुंबाच्या पातळीवर घेतले जाणारे खर्च विषयक निर्णय तसेच कर्ज घेण्याचे निर्णय सध्याच्या उत्पन्नाबरोबरच भविष्यकाळात आपले उत्पन्न वाढणार आहे का या बाबीवर अवलंबून असते. जर भविष्यकाळातील उत्पन्न कमी होणार असेल किंवा रोजगार जाण्याची शक्यता असेल तर अशावेळी कुटुंब चालू उत्पन्न चांगले असून देखील आपली बचत वाढवते आणि खर्च कमी करते. अशा प्रकारे कुटुंबाचे अर्थनियोजन राष्ट्रीय पातळीवर मात्र मोठा परिणाम करत असते. समाजातील मोठ्या वर्गाचे उत्पन्न निश्चित नसेल तर राष्ट्रीय स्तरावरील मागणी कमी होऊन मंदी निर्माण होते. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे रॉबर्ट हॉल हे उपभोगाचे अर्थशास्त्र आणि आर्थिक चक्रे व रोजगार याचे विशेष अभ्यासक असून त्यांनी भविष्यकालीन उत्पन्नाच्या शक्यतेचा सखोल अभ्यास केला आहे. सामान्यत: एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न वाढले की तिचा उपभोग वाढतो आणि उत्पन्न कमी झाले की उपभोग कमी होतो, असे मानले जाते. मात्र प्रत्यक्षात व्यक्तींचे निर्णय केवळ आजच्या उत्पन्नावर अवलंबून नसतात. भविष्यातील उत्पन्न, नोकरीची सुरक्षितता, अपेक्षित खर्च, कर्जाचा बोजा आणि आर्थिक परिस्थितीविषयीचा विश्वास या घटकांचाही त्यावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपये आहे. त्या कुटुंबाला भविष्यात नोकरी जाण्याची किंवा उत्पन्न कमी होण्याची भीती वाटत असेल, तर ते सध्याचा खर्च कमी करून बचत वाढवू शकते. याउलट, भविष्यात उत्पन्न वाढेल असा विश्वास असल्यास ते घर, वाहन किंवा इतर टिकाऊ वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च वाढवू शकते. अशा लाखो कुटुंबांच्या निर्णयांची बेरीज संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणीवर परिणाम करते. हॉल यांच्या संशोधनाचा महत्त्वाचा संदेश असा आहे की, अर्थव्यवस्थेतील उपभोगाचा अभ्यास करताना केवळ वर्तमान उत्पन्न नव्हे, तर भविष्याबद्दलच्या अपेक्षांचाही विचार करणे आवश्यक आहे
भारतीय संदर्भ बिंदू
भारत सध्या नैसर्गिक संकट आणि जागतिक स्तरावरील युद्धातून निर्माण झालेली महागाई अशा दुहेरी आपत्तीत सापडला आहे. या कालखंडात आपला विकास दर सात टक्केपेक्षा अधिक राहील अशी जरी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात विकासाचे लाभ किती प्रमाणात झिरपतात हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढवल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम गुंतवणूक, मागणीवर होत असतो. तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी या बाबी आव्हानात्मक असल्या तरी आपली मोठी बाजारपेठ संरक्षित करण्यासाठी कमी उत्पन्न गटातील लोकांना अधिक रोजगार मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात भविष्यकालीन चिंता राहणार नाही अशी सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे हे देखील महत्त्वाचे ठरते. सध्या शासनामार्फत 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवठा होत असून अनेक लाडक्या योजनेतून लोकांच्या हाती उत्पन्न शक्ती वाढवली जात आहे. आर्थिक स्थैर्य म्हणजे केवळ महागाई नियंत्रणात ठेवणे किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे नव्हे. अर्थव्यवस्थेतील उत्पादन, रोजगार, उपभोग, गुंतवणूक आणि आर्थिक अपेक्षा यांमध्ये अनावश्यक चढ-उतार होऊ न देणे, ही आर्थिक स्थैर्याची व्यापक संकल्पना आहे. 2026 च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा मूलभूत संदेश असा आहे की, अर्थव्यवस्थेचे स्थैर्य निर्माण करण्यासाठी व्यापक आर्थिक आकडेवारीइतकेच महत्त्व सामान्य नागरिकांचे निर्णय, उद्योगांचे वर्तन आणि भविष्याविषयीच्या अपेक्षांना आहे. या घटकांचा शास्त्राrय अभ्यास करून योग्यवेळी राबविलेली आर्थिक धोरणे अधिक स्थिर, समावेशक आणि शाश्वत विकासाला हातभार लावू शकतात. विकासाची गती नेहमीच महत्त्वाची असते. याबाबत भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असे चित्र असले तरी विकासाची प्रक्रिया रोजगारावरही अवलंबून असते. प्रत्येकाला सन्मानाचे व त्याच्या क्षमतेचे रोजगार उपलब्ध होतील असा प्रयत्न करणे ही महत्त्वाची बाब आहे. विकास किती याबरोबर कोणासाठी हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.
डॉ. विजय ककडे
