बेळगावमध्ये स्थापणार ग्लोबल इनोव्हेशन पार्क
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा : बेंगळूरमध्ये तीन दिवसीय तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन
बेंगळूर : राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला चालना देण्यासाठी बेळगाव, बेंगळूर आणि म्हैसूर येथे तीन ग्लोबल इनोव्हेशन पार्क स्थापन केले जातील. तसेच म्हैसूरच्या कोचनहळ्ळी येथे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर विकसित केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. बेंगळूरच्या राजवाडा मैदानावर तीन दिवसीय ‘बेंगळूर तंत्रज्ञान परिषद-2024’ (बीटीएस) च्या 27 व्या आवृत्तीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यातील प्रमुख शहरे असलेल्या बेळगाव, बेंगळूर व म्हैसूर येथे स्थापन होणारे ग्लोबल इनोव्हेशन पार्क हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सना (जीसीसी) त्यांच्या शाखा उघडण्यास अनुकूल करून देतील. म्हैसूरच्या कोचनहळ्ळी येथील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टरमुळे राज्याची सेमीकंडक्टर उत्पादन क्षमता आणखी मजबूत होईल. परिणामी रोजगारनिर्मिती होऊन शहरी-ग्रामीण समानतेला आणखी वाव मिळेल, असे मतही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी देशात प्रथमच कर्नाटकात तयार करण्यात आलेल्या ‘जीसीसी कृती धोरण’चे मुख्यमंत्र्यांनी अनावरण केले. याविषयी बोलताना ते म्हणाले, पुढील पाच वर्षात राज्यात सध्या असणाऱ्या 875 ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससह आणखी 500 सेंटर्स स्थापन केले जातील. यातून 3.5 लाख जणांना रोजगार मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हुबळी-धारवाडला ईव्ही झोन
मंगळूरला फिनटेक झोन, हुबळी-धारवाडला ईव्ही झोन आणि म्हैसूरला ड्रोन झोन म्हणून विकसित करण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. सरकार नाविन्यता, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकास करण्यास कटिबद्ध असून औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी सातत्याने प्रेरणा देईल. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बेंगळूरला संरक्षण उपकरणे निर्मिती आणि एअरोस्पेस उद्योगांनी ठळकपणे प्रसिद्धी दिली होती. आता माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप हब म्हणून बेंगळूरचा विस्तार झाला आहे. आयटी, डीप फेक, बायोटेक, बायोलॉजिकल सायन्स, बायो मॅन्युफॅक्चरिंग, अॅडव्हान्सड् मॅन्युफॅक्चरिंग इ. क्षेत्रात बेंगळूरची ओळख आहे, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. याप्रसंगी टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार, स्विग्गीचे सहसंस्थापक श्रीहर्ष मॅजेती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे, कौशल्य विकासमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, कियोनिक्सचे अध्यक्ष शरत बच्चगौडा, महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योजक क्रिस गोपालकृष्ण, किरण मुझुमदार शाह, प्रशांत प्रकाश व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
‘निपूण’ योजनेंतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण
राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘निपूण’ योजनेला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चालना दिली. निपूण योजनेंतर्गत एका वर्षात 1 लाख जणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, इंटेल, अॅक्सेंचर, आयबीएम, बीएफएसआय कन्सोर्टियम या पाच कंपन्यांसोबत निपूण योजनेंतर्गत करार करण्यात आला आहे, अशी माहिती शिवकुमार यांनी यावेळी दिली.