ज्वालामुखींमुळे ग्लोबल कुलिंग पीरियड
पृथ्वीवर येणार हिमयुग
आइसलँड या बेटसदृश देशामध्ये अत्यंत शक्तिशाली ज्वालामुखी विस्फोटानंतर आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तेथील आकाश धूर आणि धूळाने भरून गेला आहे. याचदरम्यान अनेक सेवा रोखण्यात आल्या आहेत. तसेच प्रभावित भागातील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. ज्वालामुखीचा विस्फोट ही नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु आता शक्तिशाली ज्वालामुखीय विस्फोट जगाला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवू शकतो असे म्हटले जात आहे.
15 जून 1991 रोजी फिलिपाईन्सच्या माउंट पिनातुबोमध्ये ज्वालामुखीय विस्फोट झाला होता, त्याची तीव्रता अधिक असल्याने वायू आणि राख 40 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत फैलावली होती. अनेक आठवड्यांपर्यंत हा प्रकार घडत होता. धूळ आणि धूर फैलावत राहिला आणि वातावरणातील स्ट्रेटोस्फियर या आच्छादनापर्यंत ते पोहोचले. यानंतर हे जगात फैलावले होते. तेव्हापासून अनेक पुढील महिन्यांपर्यंत जागतिक तापमान 0.5 अंश सेल्सिअसने कमी राहिले होते.

रहस्यमयी ज्वालामुखीय विस्फोट
19 व्या शतकाच्या प्रारंभापासून अनेक वर्षांपर्यंत इंडोनेशियाच्या माउंट तंबोरामध्ये अनेक विस्फोट झाले होते. त्यांना रहस्यमय इरप्शन म्हटले जाते, कारण त्यांच्याविषयी खास माहिती कधीच मिळू शकलेली नाही. परंतु हे विस्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याने पृथ्वीचे तापमान थेट 1.7 अंश सेल्सिअसने घटले होते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ज्वालामुखी विस्फोटानंतर काही काळात तापमान कमी झाले होते. वैज्ञानिक आता यावर संशोधन करत असून लवकरच निष्कर्षांपर्यंत ते पोहोचतील.
असे कसे घडते?
ज्वालामुखीच्या अत्यंत शक्तिशाली विस्फोटातून लाव्हारसच बाहेर पडत नाही, तर मोठ्या प्रमाणात सल्फर वायू देखील बाहेर पडतो. हा वायू वायुमंडळातील अन्य वायूंसोबत मिळून एअरोसोल तयार करतो. तेथे छोट्या-छोट्या तरल थेंबाचे दाट आवरण आहे. जे वरच्या बाजूने अशाप्रकारे तयार होते, की सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पोहोचणार नाहीत. यामुळे पृथ्वीवरील तापमान कमी होते. ज्वालामुखी विस्फोट किती शक्तिशाली होता यावर याचा प्रभाव कालावधी अवलंबून असतो. या कालावधीला ग्लोबल कूलिंग पीरियड म्हटले जाते. अनेकदा ज्वालामुखीच्या आसपास असलेल्या भागांमध्येच हा प्रभाव दिसून येतो.
किती विस्फोटांची गरज?
इरप्शन हाय इंटेंसिटीचा असावा हे तर निश्चित आहे, माउंट पिनातुबोची घटना याच श्रेणीतील होती. यात धूळ आणि धूर 25 किलोमीटर किंवा अधिक उंचीपर्यंत पोहोचतो, यात अनेक अब्ज टन सल्फर वायू असतो, जो पूर्ण वायुमंडळाला घेरू शकेल. अशा घटना दर काही दशकांमध्ये होत असतात. परंतु 90 च्या दशकात झालेला विस्फोट हा शतकातील सर्वात मोठा ज्वालामुखीय विस्फोट मानला जातो.
हिमयुग..
ज्वालामुखीचा विस्फोट कशाप्रकारे जगाला थंड करू शकतो, याचे उदाहरण तीन वर्षांपूर्वी एका संशोधनात मिळाले होते. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना टेक्सासच्या पर्वतीय भागांमधील गुहांमध्ये 13 हजार वर्षांपूर्वी अखेरचे हिमयुग होते याचे संकेत मिळाले आहेत. ज्वालामुखी विस्फोटामुळे तेव्हा आइस एज आणखी हजार वर्षे पुढे सरकल्याचे आढळून आले. विस्फोटासोबत सल्फरचे कण वायुमंडळाच्या उर्वरित वायूंमध्ये मिसळले गेले असावेत. यामुळे दाट आच्छादन तयार होत जगातील तापमान कमी झाले. यादरम्यान तापमान 3-4 अंशाने कमी झाले असावे असे मानले जाते. या काळाला यंगर ड्रायस देखील म्हटले जाते. ही स्थिती सुमारे 1300 वर्षांपर्यंत कायम राहिली होती.