For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भूतानमध्ये हिमनदीचे सरोवर फुटले

06:09 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भूतानमध्ये हिमनदीचे सरोवर फुटले
Advertisement

पाणी भारतात पोहोचण्याचा धोका : पश्चिम बंगाल, आसाममध्ये पुराचा इशारा, 10,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Advertisement

वृत्तसंस्था / थिम्पू/कोलकाता

भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर गुरुवारी रात्री उशिरा फुटल्याने प्रचंड विध्वंस झाला आहे. प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा, गासा त्साचू, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे वाहून गेला. पुनाखा-गासा महामार्गाच्या काही भागाचेही नुकसान झाले असून, वाहतूक थांबवण्यात आली आहे. तथापि, तूर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे संकोश नदीला पूर आला आहे. ही नदी भूतानमध्ये उगम पावून आसाम आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून वाहत येत नंतर ब्रह्मपुत्रेला मिळते. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे प्रशासनाने 10,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये हलवले आहे. रात्रभर सायरन वाजवून लोकांना शक्य तितक्या लवकर घरे सोडण्याचे आवाहन करण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.

भूतानमधील शिंताफू हिमनदीचे सरोवर फुटल्याने त्यात साठलेले पाणी नद्यांमार्फत भारतात पोहोचू शकते. हे पाणी प्रथम भूतानच्या मो छू नदीत पोहोचेल. त्यानंतर मो छू आणि फो छू नद्या एकत्र येऊन पुनात्सांगछू नदी तयार होते. ही नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन भारतात प्रवेश करते. भारतात ती संकोश नदी म्हणून ओळखली जाते. तिच्या पाण्यामुळे पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार आणि जलपाईगुडीच्या सखल भागांमध्ये, तसेच आसाममधील कोकराझार आणि धुबरी जिह्यांमध्ये पूर येऊ शकतो. संकोश नदी पुढे आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. अशाप्रकारे, भूतानमधील सरोवरातील पाणी नद्यांमार्फत भारताच्या मैदानी प्रदेशात पोहोचू शकते.

भूतानमधील स्थिती

29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी भूतानमधील गासा जिह्यातील लाया गेओग येथील लुंगोमधील शिंताफू त्शो तलावातून पाणी वाहू लागले. हा तलाव वाकिला पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला असून, तो भूतानच्या 17 संभाव्य धोकादायक हिमनदी तलावांपैकी एक आहे. तलावातून सोडलेले पाणी मो छू नदीच्या पाणलोट क्षेत्राच्या पलीकडे पसरले. रात्री 8:15 च्या सुमारास पुराचे पाणी ताक्तसेमाखांग परिसरात पोहोचल्याचे वृत्त आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गासा त्साचू गरम पाण्याच्या झऱ्याची सुविधा उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे.

भारताच्या सीमावर्ती जिह्यांमध्ये सतर्कता

भूतानमधून येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार, जलपाईगुडी आणि कूचबिहार या संवेदनशील भागांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे. आसामच्या धुबरी जिह्यातील प्रशासनही नदीच्या पाण्याची पातळी आणि संभाव्य पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दार्जिलिंग टेकड्या, तराई आणि दुआर्स भागातील लोकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या विशेष सूचनेनुसार, पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिह्यात आणि आसामच्या धुबरी जिह्यात संकोश नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि सखल भागात राहण्राया लोकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिह्यातील प्रशासन आणि पोलिसांनी मदत आणि बचावकार्याची तयारी तीव्र केली आहे. सुमारे 4,000 ते 5,000 लोकांना शाळांच्या इमारतींमध्ये उभारलेल्या मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे, तर 6,000 हून अधिक लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस, नागरी संरक्षण पथके आणि जिल्हा प्रशासनही समन्वयाने काम करत आहेत. मदत केंद्रांवर कोरडा शिधा, पिण्याचे पाणी आणि इतर अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था केली जात आहे. प्रशासनाने लोकांना नदीकाठी आणि सखल भागांमध्ये जाणे टाळण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.