विद्यार्थी, रुग्ण, उद्योजकांना व्हिसा द्या !
अफगाणिस्तानकडून भारत सरकारकडे मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अफगाणिस्तानातील विद्यार्थी, रुग्ण आणि उद्योजकांना भारताने व्हिसा द्यावा, अशी मागणी त्या देशाच्या तालिबान प्रशासनाने भारताकडे केली आहे. भारताच्या विदेश विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे कार्यकारी विदेश व्यवहार मंत्री अमीर मुत्तकी यांच्यात दुबई येथे द्विपक्षीय चर्चा गुरुवारी झाली होती. त्या चर्चेत अफगाणिस्तानने ही मागणी केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
असा व्हिसा देण्यात सध्या अनेक अडचणी आहेत. कारण भारताने अद्याप अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला अधिकृत मान्यदा दिलेली नाही. तसेच अफगाणिस्तानमधून भारतात तेथील नागरीकांची आवक सुरु झाल्यास भारताच्या सुरक्षेवर त्याचा परिणाम कसा होईल, याविषयी अद्याप साशंकता आहे. कारण, अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी गट आहेत. या गटांमधील लोक विद्यार्थी किंवा रुग्ण असल्याचे भासवून भारताचा व्हिसा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील भारताच्या दूतावासात व्हिसा कक्ष अद्याप स्थापन झालेला नाही. या तीन प्रमुख कारणांमुळे भारताने अफगाणिस्तानची ही मागणी अद्याप मान्य केलेली नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
तालिबानचे आश्वासन
अफगाणिस्तानातील पात्र लोकांना भारताने व्हिसा दिला, तर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी चिंता भारताने करु नये. आम्ही योग्य प्रकारे लोकांची तपासणी करुनच त्यांना भारतात पाठवू, असे आश्वासन तालिबानच्या मंत्र्यांनी भारताला दिले आहे, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, भारतासाठी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. कारण 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारताने अफगाण नागरीकांसाठी व्हिसाचे नियम अत्यंत कठोर केले आहेत. ते सहजासहजी सौम्य करता येणे भारताला शक्य नाही. त्यामुळे अफगाणिस्तानची ही मागणी मान्य होणे कठीण असून भारतानेही आत्ताच धोका पत्करु नये, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
ई व्हिसा पोर्टलचा उपयोग
भारताने अफगाणिस्तानच्या नागरीकांसाठी व्हिसाचा मार्ग पूर्ण बंद केलेला नाही. त्यांच्यासाठी नव्या प्रकारचा ई-इमर्जन्सी एक्स मिसलेनियस या प्रकारचा व्हिसा देण्यात येतो. त्यासाठी त्यांना भारताच्या ई व्हिसा पोर्टलवर अर्ज करता येतो. काही अफगाणी नागरीकांनी असे व्हिसे मिळविलेले आहेत आणि ते भारतात त्यांच्या आधारावर येइऊ शकतात. सध्या अफगाणिस्तानात अनेक असे विद्यार्थी आहेत, की जे भारतात पूर्वी शिकत होते. पण ते सध्या भारतात येऊ शकत नाहीत. कारण, 2021 नंतर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येऊ दिलेले नाही.
संबंध सुधारण्यासाठी पावले
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीशी संबंध सुधारण्यासाठी भारतानेही काही पावले टाकली आहेत. त्या देशाला दिली जाणारी मानवीय साहाय्यता भारत सुरु ठेवणार आहे. तसेच अफगाणिस्तानात काही आर्थिक प्रकल्पही भारताकडून हाती घेतले जाणार आहेत. या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे भविष्यकाळात दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येण्याची शक्यता आहे.