या कारणासाठी ट्रंप यांना ‘नोबेल’ द्या !
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या धोरणांमुळे भारत आणि रशियाला एकत्र आणले आहे. या कारणासाठी त्यांना शांततेचे नोबेल पारितोषक देण्यात यावे, अशी उपरोधिक सूचना अमेरिकेच्या ‘पेंटागॉन’ या सेना संस्थेचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी केली आहे. ट्रंप यांना त्यांनी विश्वशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी नव्हे, तर या कारणासाठी नोबेल पुरस्कार देण्यात यावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारताच्या यशस्वी दौऱ्याची सांगता होत असताना रुबिन यांनी केलेल्या या या विधानाची जागतिक राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंबंधी रशियाने अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ती पाहता या दौऱ्यात दोन्ही देश एकमेकांच्या अधिक निकट आल्याचे दिसत आहे. हे ट्रंप यांच्या धोरणांमुळे घडत आहे. ट्रंप यांनी भारताला विनाकारण दुखावले असून त्यामुळे भारत आता रशियाच्या अधिकाधिक जवळ जात आहे. यामुळे अमेरिकेचा कोणता लाभ झाला, असा प्रश्नही मायकेल रुबिन यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.