विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या
शाळा-कॉलेज नोकर संघाच्यावतीने शिक्षणमंत्र्यांना साकडे
बेळगाव : राज्यातील 1995 नंतरच्या विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या, या मागणीसाठी बुधवारी कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा व कॉलेज नोकर संघाच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले. अनुदानासाठी आपले प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्र्यांसोबत आपणही चर्चा करत असल्याचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिले. बेळगावसह राज्यातील शेकडो शाळांमधील हजारो शिक्षक अनुदान नसल्याने पगाराविना काम करत आहेत. 1995 नंतर सुरू झालेल्या शाळांना अद्याप राज्य सरकारने अनुदान दिलेले नाही.
यामुळे विनाअनुदानित शाळा शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अनुदान देण्याची मागणी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. विनाअनुदानित शाळांसाठी 133 कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने राज्य सरकारने महसूल विभागाच्या सहकार्याने हा निधी उभारून शाळांना अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष एस. एस. मठद, राज्य प्रधान कार्यदर्शी सलीम कित्तूर, सहकार्यदर्शी एम. ए. कोरीशेट्टी, पी. पी. बेळगावकर, व्ही. बी. होसूर, पी. आर. पाटील, ए. बी. पाटील, मारुती अजानी, कोमल गावडे, अजित नाकाडी, तुकाराम कुराडे, एस. जी. जाधव यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.