'खऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या'
कोल्हापूर :
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे साडेतीन लाख बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. यापैकी दरवर्षी एक लाख बांधकाम कामगारांचे नूतनीकरण होते. या कामगारांच्या पाल्याला वर्गनिहाय शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरल्यानंतर एक महिन्याच्या आत कागदपत्रांची पडताळणी करून शिष्यवृत्तीची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा होते.
बांधकाम कामगार महामंडळाकडून नोंदीत कामगारांना अनेक प्रकारचे लाभ दिले जातात. भांडी, बांधकामासाठी लागणारे सांहित्य, आरोग्य विमा, आरोग्याच्या विविध सुविधा, घर बांधण्यासाठी अनुदान यासह अन्य शासकीय फायदे बांधकाम कामगारांना मिळतात. यामध्ये महत्वाचा लाभ म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्याला शैक्षणिक शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती पहिलीच्या वर्गापासून ते पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीही दिली जाते.
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी किमान एक लाख बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. बांधकाम कामगारांनी आपला मुलगा कोणत्या इयत्तेत शिक्षण घेतो त्यासंदर्भातील ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरल्यानंतर संबंधीत कामगाराला नियुक्तीपत्र मिळते. पडताळणीत पात्र ठरलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. अलीकडे मात्र बोगस कामगारांची नोंदणी मोठया प्रमाणात झाली आहे. त्यामुळे खऱ्या बांधकाम कामगारांचा मुलगा शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी बोगस नोंदीत कामगारांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच खऱ्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्यावी.
- बोगस बांधकाम कामगारांची नोंदी रद्द कराव्या
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी एक लाख बांधकाम कामगारांचे नूतनीकरण होते. परंतू यामध्ये अनेक जणांनी बोगस नोंदणी केलेली आहे. तरी सहाय्यक कामगार आयुक्तांनी लक्ष घालून या बोगस नोंदी रद्द कराव्या.
शिवाजी मगदूम (लाल बावटा बांधकाम कामगार संघटना)
- निदर्शनास आणून दिल्यास लाभ थांबवू
बांधकाम कामगार किंवा अन्य घटकांनी बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी निदर्शनास आणून द्याव्या. आम्ही तपासणी करून संबंधीत बोगस बांधकाम कामगारांचे सर्व लाभासह शिष्यवृत्ती थांबवू. तसेच नियमाने संबंधीतावर कारवाईही करू.
विशाल घोडके (सहाय्यक कामगार आयुक्त)
- शिष्यवृत्तीचे प्रकार व रक्कम
पहिली ते सातवी : 2500
आठवी ते दहावी : 5 हजार
दहावी ते बारावी : 10 हजार
पदवी प्रथम, व्दितीय, तृतीय : 20 हजार
वैद्यकीय पदवीसाठी : 1 लाख
अभियांत्रिकी पदवीसाठी : 60 हजार
पदव्युत्तर पदवीसाठी : 25 हजार