हायब्रीडपेक्षा बायोगॅसला अधिक प्रोत्साहन द्या!
मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांची मागणी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हायब्रीड वाहनांपेक्षा बायोगॅसवर चालणाऱ्या वाहनांना सरकारकडून अधिक प्रोत्साहन मिळायला हवे, कारण त्यामुळे निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन सुनिश्चित होते आणि शेतीसाठी उपयुक्त जैविक खतेही तयार होतात. असे मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
बायोगॅसचा वापर स्वतंत्रपणे कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) म्हणून केला जाऊ शकतो, जो वाहने चालवण्यासाठी सीएनजीला एक पर्याय आहे. तो जीवाश्म इंधनावर आधारित सीएनजीमध्ये मिसळलाही जाऊ शकतो. त्यांनी असाही युक्तिवाद केला की, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्हीएस) जीएसटीची तफावत नेहमीच असायला हवी आणि ईव्हीवर कमी कर आकारला जावा. त्यांनी काही मूळ उपकरण उत्पादकांच्या (ओइएमएस) मागण्या फेटाळून लावल्या, ज्यांनी दोघांमध्ये कर समानतेची मागणी केली होती.
भार्गव म्हणाले, ‘देशात बायोगॅसमध्ये प्रचंड क्षमता असूनही, तो अजिबात लोकप्रिय झालेला नाही. याचे कारण असे आहे की, सहज उपलब्ध असलेल्या शेतीतील कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर करू शकणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांना कोणतेही प्रोत्साहन नाही. त्यामुळे बायोगॅसवर चालणाऱ्या वाहनांना जीएसटीमध्ये अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे आणि प्रस्तावित ‘कॉर्पोरेट सरासरी इंधन कार्यक्षमता’ नियमांनुसार त्यांना इतर वाहनांपेक्षा (जसे की हायब्रीड) अधिक सूट मिळाली पाहिजे.’
इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांच्या जीएसटीमध्ये नेहमीच काही तफावत असली पाहिजे. ईव्हीवरील जीएसटी नेहमीच कमी असावा, जरी ते पूर्णपणे शून्य उत्सर्जन सुनिश्चित करत नसले तरीही, कारण चार्जिंग स्टेशन्सना कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांमधून वीज मिळते, असेही भार्गव यांनी स्पष्ट केले आहे.