रसाळ मुद्रा दे रे राम
जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेने चालते, सर्व ब्रह्मांडावर त्याची सत्ता असूनही कुठल्याही चांगल्या कर्माचे श्रेय जेव्हा माणूस स्वत:कडे घेतो तेव्हा श्रीरामांना हसू येते. दुसरे म्हणजे जन्म झाल्याक्षणीच परतीचे म्हणजे मृत्यूचे तिकीट माणसाच्या हाती पडते. फक्त मृत्यू केव्हा, कधी, कुठे हे काही त्याला कळत नाही. सारे जग मृत्यूकडेच धाव घेते. हळूहळू एक एक पिढी काळाच्या पोटात गडप होताना माणूस बघत असतो आणि माणूस हा मर्त्य आहे हे कळत असूनदेखील आपण मात्र चिरंजीव आहोत या थाटात तो जगत असतो. मी या जगात कायम राहणार आहे ही भावना घेऊन जगणाऱ्या माणसांकडे पाहून श्रीरामांना हसू येते.
श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये विलक्षण शक्ती आहे. श्री रामरक्षा कवचात श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो ही प्रार्थना करताना श्रीरामांना सौमित्रीवत्सल असे म्हटले आहे. सौमित्र हे लक्ष्मणाचे नाव आहे. धाकटा भाऊ लक्ष्मण श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. अपत्यवत प्रेम असणाऱ्या श्री लक्ष्मणाकडे बघताना श्रीरामांचा चेहरा वत्सल भावाने ओसंडून गेला नाही तरच नवल. म्हणून म्हटले आहे ‘मुखं सौमित्रीवत्सल:’ श्रीरामांच्या मुखातून स्रवणारी मधुर वाणी आणि त्यांचे प्रेम संपादन करणारा लक्ष्मण भाग्यवान आहे. असेच प्रेम श्रीराम माझ्यावर करोत आणि माझ्या मुखाचे रक्षण करोत अशी ही प्रार्थना आहे. श्रीरामांच्या मुखावर सदैव स्मित हास्य आहे. कारण श्रीराम हे कर्म अकर्माच्या पलीकडे, सुखदु:खांच्या पलीकडे ज्ञानस्वरूप आहेत.
श्रीरामांचा राज्याभिषेक ठरला. अयोध्येमध्ये सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना मंथरेद्वारा कैकयीच्या मनात अचानक बदल झाला व तिने राजा दशरथांना श्रीरामांना चौदा वर्षे वनवास द्या हा वर मागून घेतला. अयोध्यानरेश राजा दशरथ भावनाशील असल्याने स्वत:च्या मुखातून ही आज्ञा श्रीरामांना देणे अशक्य होते. तेव्हा कैकयीने स्वत:च श्रीरामांना भरताला राज्याभिषेक व तुला चौदा वर्षे दंडकारण्यात वनवास हे मागून घेतलेले दोन वर सांगितले. हे ऐकल्यानंतर श्रीरामांच्या मुखावर स्मित आले. अकस्मात मिळालेली विपरीत आज्ञा ऐकून श्रीराम का बरे हसले? कारण श्रीरामांना मायादेवीचे कौतुक वाटले. माया आपले काम चोख बजावत आहे हे बघून श्रीरामांना हसू आले. ज्ञानस्वरूप असलेला परमात्मा रामरूपात आला तो राक्षसांचा नि:पात करण्यासाठी. आपल्या अवतारकार्याचे स्मरण करून देणाऱ्या देवांचेही श्रीरामांना कौतुक वाटले आणि हसू आले.
श्री संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथामध्ये केवट आख्यान आहे. श्रीरामांनी गंगा पार करण्यासाठी केवटाकडे नौका मागितली आहे. अख्खे जग ज्याच्याकडे मागणी करते, याचना करते त्या प्रभू श्रीरामांनी केवटाला नौका मागितली तेव्हा तो म्हणाला, देणार नाही. मी तुमचे मर्म जाणतो. तुमच्या पायाच्या धुळीने दगडाची अहिल्या नावाची सुंदर नारी झाली. माझ्या नावेला पाय लागताच तिच्या जागी स्त्राr निर्माण झाली तर मी काय करू? माझ्या पोटापाण्याचे काय? तेव्हा श्रीरामांना हसू आले. कारण त्याच्या रांगड्या बोलण्यामागे असलेले सरळ, निरोगी, निर्भय अंत:करण श्रीरामांनी जाणले होते. केवट म्हणतो, मला माहीत आहे, तुम्हाला पोहता येत नाही. हे बोलणे ऐकून श्रीराम केवटाकडे नुसते बघतच राहिले. सीतामाता, लक्ष्मण हे हैराण झाले. याला म्हणायचे तरी काय आहे? केवट म्हणाला, श्रीरामप्रभू, तुम्हाला दुसऱ्यांना पार करता येते. मात्र तुम्ही स्वत: पार होऊ शकत नाही. कारण तुम्ही संत आणि भक्तांच्या प्रेमात बुडून गेला आहात. तुम्ही कसे पोहणार? म्हणून म्हणतो, तुम्हाला जर दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे असेल तर मी म्हणेन तसे वागले पाहिजे. तेव्हा श्रीराम खळखळून हसले. संत तुलसीदास म्हणतात, ‘कृपासिंधू बोले मुसकाई । तेहि करू जेहि तव नाव न जाई?’ श्रीराम म्हणाले, ठीक आहे. तुला जे हवे आहे, ते तू कर. तेव्हा केवटाने भक्तीने श्रीरामांकडून वदवून घेतले की नावाडीदादा, पाणी आणून माझे पाय धू. केवटाने श्रीरामांशी केलेला संवाद आणि युक्तिवाद विस्ताराने श्री राम चरितमानसमध्ये आहे. केवटाने श्रीरामांना हसवले. श्रीरामांचे हास्यमुख बघून सीतादेवी खुश झाल्या. कारण अयोध्या सोडल्यानंतर श्रीराम गंभीर होते. संत तुलसीदास म्हणतात, धन्य तो भक्त ज्याने श्रीरामांना हसवले. जगताला मुक्त करणारे श्रीराम आहेत, परंतु श्रीरामांच्या चेहऱ्यावर परिस्थितीमुळे हास्याचे बंधन आले होते. ते हास्य एका भक्ताने मुक्त केले.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने प्रश्न विचारला, श्रीरामांना हसू येते का हो? महाराज म्हणाले, अर्थात. श्रीरामांनाही माणसाप्रमाणे हसू येते. तीन प्रसंगी त्याला हसायला येते. माणूस जेव्हा स्वत:च्या कर्तेपणाचा अभिमान बाळगतो तेव्हा त्याला हसू येते. जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेने चालते, सर्व ब्रह्मांडावर त्याची सत्ता असूनही कुठल्याही चांगल्या कर्माचे श्रेय जेव्हा माणूस स्वत:कडे घेतो तेव्हा श्रीरामांना हसू येते. दुसरे म्हणजे जन्म झाल्याक्षणीच परतीचे म्हणजे मृत्यूचे तिकीट माणसाच्या हाती पडते. फक्त मृत्यू केव्हा, कधी, कुठे हे काही त्याला कळत नाही. सारे जग मृत्यूकडेच धाव घेते. हळूहळू एक एक पिढी काळाच्या पोटात गडप होताना माणूस बघत असतो आणि माणूस हा मर्त्य आहे हे कळत असूनदेखील आपण मात्र चिरंजीव आहोत या थाटात तो जगत असतो. मी या जगात कायम राहणार आहे ही भावना घेऊन जगणाऱ्या माणसांकडे पाहून श्रीरामांना हसू येते.
पैसा हे सुख नसून सुखाचे केवळ साधन आहे. पैशामुळे समाधान, शांतता, प्रेम प्राप्त होत नाही हा सतत अनुभव असूनही माणूस पैशामागे दिवस-रात्र धावत असतो हे बघून श्रीरामांना हसू येते. आपलीच अज्ञानी बालके भातुकलीच्या खेळाला सत्य मानून प्रपंचातच जिव्हाळ्याने गुंतून, रमून गेली आहेत हे बघून श्रीरामांना खरेच किती हसू येत असेल?
हास्य म्हणजे आनंद. विश्वात भरून उरलेला आनंद परमेश्वर मुक्तपणे हवा तेवढा वाटतो आहे. ऋतू हे त्याचे प्रतीक आहे. प्रत्येक कृतीत सृष्टी नवे वस्त्र परिधान करीत आनंद व्यक्त करते आहे. माणूस मात्र मोहात गुंतल्यामुळे त्याला सृष्टीचे हास्य दिसत नाही. भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये योगाचे अमृत आहे, असे ज्ञानश्रेष्ठ ज्ञानोबामाऊली म्हणतात.
माऊली म्हणतात, श्रीकृष्णाने अर्जुनाला ब्रह्मरसाची मेजवानी केली आणि योगायोगाने आम्ही तिथे पाहुणे म्हणून आलो आणि आम्हालाही अमृत प्यायला मिळाले. योग म्हणजे ज्ञान व आनंद. संजय धृतराष्ट्राला हे सांगतो आहे. परंतु धृतराष्ट्र म्हणतो की संजय या माझ्या मुलांचे सांगायला तुला इथे ठेवले आहे आणि तू हे योगाविषयी मध्येच काय सांगतो आहेस? अमृताची किंमत धृतराष्ट्राला नव्हती हे कळल्यावर संजय मनात हसला. माऊली म्हणतात, ‘हे जाणूनी मनी हासिला । म्हणे म्हातारा मोहे नाशला । एर्हवी बोलु तरी भला जाहला । अवसरी इथे?’ हा म्हातारा मुलांच्या मोहाने वाया गेला. भगवान श्रीकृष्ण अमृत पाजत आहेत आणि धृतराष्ट्राच्या डोक्यात काही वेगळेच चालले आहे हे कळून संजयला हसू आले.
हास्याचे अनेक प्रकार आहेत. ते स्वभावाचे द्योतक आहेत. लहान मुलांचे हसणे निष्पाप असते. तरुण बेधडक हसतात, तर अनुभवी जाणून हसतात. सातमजली हास्य, खळखळून, लाजून, मनातल्या मनात हसणे हे मानवी स्वभावाचे वैशिष्ट्या आहे. संत गूढ हसतात. आत्मस्वरूपात रमलेल्या संतांचे हास्य सोहम असते. निष्कपट माणसे हसरी असतात. समर्थ रामदास स्वामी श्रीरामप्रभुंना म्हणतात, ‘रसाळ मुद्रा दे रे राम’. शाश्वत आनंदाकडे जाणारी ती खूण आहे. हे सामर्थ्य श्रीरामकृपेने लाभो हीच प्रार्थना
-स्नेहा शिनखेडे